Join us

नीट परीक्षेतील जीवशास्त्र, रसायनशास्त्र विषय सोप्या ते मध्यम स्वरूपाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:06 AM

मुंबई : रविवारी देशभरातून सुमारे १६ लाख विद्यार्थी पदवीपूर्व वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेसाठी उपस्थित झाले ...

मुंबई : रविवारी देशभरातून सुमारे १६ लाख विद्यार्थी पदवीपूर्व वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेसाठी उपस्थित झाले होते. यावेळी बहुतेक विद्यार्थ्यांना जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विभाग मध्यम ते सोप्या स्वरूपाचे वाटले. अनेकांना भौतिकशास्त्र विषयात अडचण जाणवली. यंदाही महाराष्ट्रात सर्वाधिक अर्जदार आहेत, ज्यात राज्यातील २.२ लाख नोंदणीकृत उमेदवार सहभागी आहेत. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडली. तर काही विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत अनेक तक्रारी केल्या. त्यांना जाणवलेल्या त्रुटींबाबत त्यांनी राष्ट्रीय चाचणी एजन्सीकडे संपर्क साधला.

काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रावर, अधिकाऱ्यांनी आमची प्रवेशपत्रे तपासली नाहीत, याचा अर्थ एनटीएला आता आम्ही परीक्षेला बसल्याची माहिती नाही. या प्रकरणात विद्यार्थ्यांनी एनटीएला लक्ष घालण्यास सांगितले आहे. काही विद्यार्थ्यांनी केंद्रावरील इन्व्हिजिलेटरने आमची ऑप्टिकल मार्किंग रिकग्निशन शीट उत्तर पुस्तिकेपासून वेगळी केल्याचे सांगितले. एनटीएच्या नियमांमध्ये ओएमआर शीट उत्तरपत्रिकेसोबत जोडावी लागेल असे नमूद केले आहे. त्यामुळे ओएमआर शीटविना उत्तरपत्रिका मूल्यांकनातून बाद होऊ शकते. याबाबत अनेक पालकांनीही एनटीएशी संपर्क साधला आहे.

काही विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी अभ्यासक्रमातून नाही तर रसायनशास्त्र विभागातील प्रश्नांची तक्रार केली. त्यामुळे या वर्षीचा पेपर मागील वर्षापेक्षा कठीण आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्कोअरिंग करणे कठीण होणार आहे. एकूण कटऑफदेखील यावेळी कमी होतील. असे तज्ज्ञांचे मत आहे.