मुंबई : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मात्र कोविडचा प्रसार वाढल्याने बायोमेट्रिक हजेरी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली जावी, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने १ जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रिक हजेरीप्रणाली पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना व ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज रुग्णसंख्या दुप्पट होत असून, सध्या ११ हजार ३६० सक्रिय रुग्ण आहेत.
तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने महापालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सोमवारपासून बायोमेट्रिक हजेरी घेणार की पूर्वीसारखीच मस्टरवर सही करावी लागणार, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा लाॅकडाऊनची शक्यता आहे.
अशाने संसर्ग वाढण्याचा धोकापालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते, परिचारिका, परिसेविका, तंत्रज्ञ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी-अग्निशमन दल कर्मचारी यांना बायोमेट्रिक मशीनवर अंगठ्याद्वारे हजेरी लावावी लागते. त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे तूर्तास बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय रद्द करण्याची मागणी कामगार संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे.शनिवार, रविवार असे दोन दिवस कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी असते. १ जानेवारीला शनिवार असल्याने बायोमेट्रिक हजेरीची आवश्यकता नाही.