महापालिकेच्या बायोमेट्रिकचा घोळ सुरूच; ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 05:08 AM2019-10-06T05:08:04+5:302019-10-06T05:08:18+5:30
जुलै २०१७ पासून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. यासाठी महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये ३,९०० यंत्रे बसविण्यात आली आहेत
मुंबई : महापालिकेच्या कारभारात शिस्त आणण्यासाठी आणलेले बायोमेट्रिक हजेरी यंत्र कर्मचाऱ्यांसाठी मात्र डोकेदुखीचे कारण ठरले आहे. या यंत्रातील दोषामुळे महिनाभर काम केल्यानंतर पगारात मोठी कपात होत असल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. या वेळेस सफाई कामगारांच्या बँकेच्या खात्यात केवळ २९० रुपये पगार जमा झाल्याचे उजेडात आले आहे. याचा फटका पाचशेहून अधिक कामगारांना बसला आहे.
जुलै २०१७ पासून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. यासाठी महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये ३,९०० यंत्रे बसविण्यात आली आहेत. हजेरी वेळेत न लागल्यास त्या दिवसाचा पगार मिळणार नाही, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले होते. या यंत्रामधील घोळ सुरूच असून अनेक वेळा गैरहजेरी लागल्याने कर्मचाºयांच्या पगारात मोठी कपात होत असल्याच्या तक्रारी कर्मचाºयांकडून येत आहेत.
सर्व २४ विभागांतील हजारो कर्मचाºयांना शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत पगार आल्याचे प्रकार याआधी घडले आहेत. याविरोधात समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी नोव्हेंबरपर्यंत बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटी दूर करू आणि तोपर्यंत कुणाचाही पगार रोखणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यातही पगार रोखल्याचे प्रकार सुरूच असल्याने कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
डी विभागातील कर्मचाºयांना फटका
डी विभागात काम करणाºया सुमारे ६०० कामगारांचे पगार या महिन्यात रोखले आहेत. यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यामध्ये सफाई कामगारांची संख्या अधिक आहे. ऐन सणासुदीच्या काळात काम केल्यानंतरही कमी वेतन हाती पडत असल्याने कामगार हवालदिल झाले आहेत.
सर्वच विभागांमध्ये कपात
पालिकेच्या ड्युटी पद्धतीमुळे अभियंत्यांना १४ ते १६ तासांपर्यंत काम करावे लागते. मर्यादेपेक्षा कित्येक पटींनी जास्त असलेल्या रकमेची कामे एका अभियंत्यावर सोपवली जातात. त्यामुळे अभियंत्यांची कामाची वेळ निश्चित करा, त्यांना बायोमेट्रिक हजेरीतून वगळा, अशी मागणी अभियंत्यांनी यापूर्वी केली आहे.