पोलीस हाउसिंगच्या कार्यकारी संचालकपदी बिपीन बिहारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:10 AM2018-06-04T02:10:56+5:302018-06-04T02:10:56+5:30
दोन दिवसांपूर्वी रिक्त झालेल्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदावर कारागृह (सुधार सेवा) विभागाचे महासंचालक बिपीन बिहारी यांची बदली करण्यात आली आहे.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी रिक्त झालेल्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या कार्यकारी संचालकपदावर कारागृह (सुधार सेवा) विभागाचे महासंचालक बिपीन बिहारी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचा पदभार महावितरण कंपनीचे संचालक (सुरक्षा) सुरेंद्र पांडेय यांच्याकडे पदोन्नतीवर देण्यात आला आहे. बिहारी यांच्याकडे पोलीस हाउसिंगबरोबरच कायदा व सुव्यवस्था विभागाचा अतिरिक्त कार्यभारही कायम ठेवला आहे.
सध्या डीजी दर्जाची आठ पदे मंजूर असली, तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख पद गेल्या दीड वर्षापासून रिक्तच आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर या महिन्याअखेरीस सेवानिवृत्त होत असून, त्या वेळी होणाऱ्या फेरबदलामध्ये हे पद भरले जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
व्ही. डी. मिश्रा हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने ‘पोलीस हाउसिंग’चे पद रिक्त झाले होते. त्यामुळे गृहविभागाने सेवा ज्येष्ठतेनुसार महावितरण कंपनीत संचालक (सुरक्षा) कार्यरत असलेले अप्पर महासंचालक सुरेंद्र पांडेय यांची पदोन्नती करीत त्यांना कारागृह महासंचालक म्हणून बढती दिली आहे. तर बिपीन बिहारी यांची मिश्रा यांच्या निवृत्तीने रिक्त झालेल्या पदावर बदली दिली आहे. पांडेय हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी महामार्ग पोलीस, मुंबईत अप्पर आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.