मुंबई : उन्हाच्या काहिलीमुळे जीव नकोसे झालेले मुंबईकर वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त आहेत. मुंबईकरांसोबतच पशु-पक्ष्यांनाही उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. यावर उपाय म्हणून कृत्रिम हौदाद्वारे प्राण्यांची तहान भागवली जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वतीने हा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात २० पाण्याचे कृत्रिम हौद तयार करण्यात आले, असून प्राण्यांची तहान भागविण्यासाठी या हौंदामार्फत पशु-पक्ष्यांना पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. उद्यानाच्या कर्मचार्यांमार्फत या कृत्रिम हौदात आठवड्याभराने १० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आणि या हौदाची क्षमता २० हजार लिटर एवढी आहे. उद्यानातील प्राण्यांना आठवड्याला १५ हजार लिटर पाणी लागते. तसेच, जानेवारी ते जून महिन्यांदरम्यान नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत कमी होत जातो. त्यामुळे या कालावधीत पशु-पक्ष्यांना या कालावधीत जास्तीतजास्त पाण्याची आवश्यकता असते. यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कृष्णनगरी उपवन, तुळशी क्षेत्र आणि येऊर क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्षेत्रात ६-७ कृत्रिम हौदांचा समावेश असणार आहे. पाण्याचे हे कृत्रिम हौद साधारणत: २० ते ३० फूट खोल आहेत. या हौदांच्या आवारात कॅमेरेही लावले असून, त्याद्वारे हौदात येणार्या प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पक्षी-प्राण्यांची तहान भागणार!
By admin | Published: May 26, 2014 3:51 AM