Join us  

कोकणवासीयांसाठी पक्षी संवर्धन महत्त्वाचे

By admin | Published: October 24, 2015 11:15 PM

सुरेश प्रभू : नेरुरपार येथील ‘पक्षी वाचवा निसर्ग वाचवा’ कार्यक्रमात मार्गदर्शन

कुडाळ : निसर्गातील पक्षी टिकणे ही काळाची गरज आहे. पक्षी टिकला तर निसर्ग टिकेल व निसर्गाचे चक्र अविरतपणे चांगल्याप्रकारे सुरु राहील. याकरिता प्रत्येक व्यक्तीने पक्षी संवर्धनासाठी पावले उचलली पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नेरूरपार वसुंधरा येथील ‘पक्षी वाचवा निसर्ग वाचवा’ कार्यक्रमात केले. विविध प्रजातीचे व विविध रंगांचे मोठ्या प्रमाणात पक्षी आपल्या कोकणात आढळतात. ही खरी कोकणची श्रीमंती आहे, असेही ते म्हणाले. लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग, वसुंधरा विज्ञान केंद्र व कोकण वाईल्ड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथील पक्षांचे संवर्धन होण्याकरिता, त्यांना पाणी, चारा मिळण्याकरिता ‘सेव्ह बर्डस सेव्ह नेचर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाचा प्रारंभ सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रभूंनी पक्षांना पाणी सहज उपलब्ध व्हावे, याकरिता मातीच्या भांड्याचे वाटप यावेळी प्राथमिक स्वरूपात नेरूरच्या सरपंच अनन्या हडकर यांच्याकडे केले. यावेळी बोलताना प्रभू म्हणाले, पक्षी हे निसर्गाचा अविभाज्य घटक आहेत. नवीन निसर्गाची उत्पत्ती पक्ष्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होते. पक्षी धान्य खातात. मात्र, जाताना बरेच काही देऊन जातात. पक्षांची राखण झाली पाहिजे. निसर्गाची कत्तल झाल्यास मनुष्य प्राणीही जिवंत राहणार नाही. कोकणाला पक्ष्यांची गरज आहे. त्यामुळे निसर्गाच्या या अविभाज्य घटकाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. यावेळी बोलताना प्रभू म्हणाले की, पक्षांचे रक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या आमच्या पक्षाची गरज या कोकणाला आहे, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, भाजपाचे काका कुडाळकर, बंड्या सावंत, शिवसेनेचे संजय पडते, राजू राऊळ, लुपिनचे योगेश प्रभू, प्रदीप बर्डे, प्रांत रवींद्र बोंबले, प्रभारी तहसीलदार प्रवीण लोकरे, अमेय प्रभू, उमेश गाळवणकर, बाळासाहेब निकम, तसेच कोकण वाईल्ड, वसुंधरा व लुपिन या संस्थांचे पदाधिकारी व जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पक्षांना पाणी व अन्न मिळावे, याकरिता या संस्थांच्यावतीने मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कुडाळातील दौऱ्याविषयी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र अनभिज्ञ होते. वरिष्ठ पातळीवरून त्यांना त्यांच्या दौऱ्याची माहिती ेदेण्यात आली नसल्याचे समजते. यामुळे काही मोजकेच पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित नव्हते. यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी जिल्ह्यातील पक्षांच्या छायाचित्रांची पाहणी केली. (प्रतिनिधी) पक्षांची राखण करणाऱ्या पक्षाची गरज : प्रभू यावेळी बोलताना प्रभू म्हणाले की, पक्षांचे रक्षण करणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या आमच्या पक्षाची गरज या कोकणाला आहे, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.