मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील हिरवळ कमी होत असल्याची ओरड केली जात असून, याचा फटका येथील जैवविविधतेलादेखील बसत आहे. तरीही येथील हिरवळ टिकावी, येथील पक्षी स्थलांतरित होऊ नयेत म्हणून पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून सातत्याने काम केले जात आहे. याच कामांचा भाग म्हणून पक्ष्यांच्या नोंदी करणे आणि हिरवळ टिकविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, रविवारीदेखील अशाच एका बर्ड रेसचे आयोजन करण्यात आले होते.पक्षी तज्ज्ञ संजय मोंगा यांनी इंडिया बर्ड रेसचे आयोजन केले होते. ५७ संघांनी या बर्ड रेसमध्ये सहभाग घेतला होता. यात १६५ सदस्यांचा समावेश होता, अशी माहिती पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले कुणाल मुनसिफ यांनी दिली. रविवारच्या बर्ड रेसमध्ये मोठ्यांसह छोट्या मुलांनीदेखील सहभाग घेतला होता. या बर्ड रेसमध्ये यती मुनसिफ ही पाच वर्षांची मुलगीदेखील सहभागी झाली होती. या व्यतिरिक्त भायखळा, माहीम, गोरेगाव येथील आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह ठाणे आणि नवी मुंबईतील बहुतांश ठिकाणी रविवारच्या बर्ड रेस अंतर्गत विविध प्रजातीच्या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या. आता तीन दिवसांत कुठे कोणत्या प्रजातीच्या पक्ष्यांच्या नोंदी झाल्या? याची माहिती सविस्तर मांडली जाईल, असे कुणाला मुनसिफ यांनी सांगितले. दरम्यान, नव्या प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद व्हावी. पक्षी संवर्धनाला दिशा मिळावी. लोकांपर्यंत अधिकाधिक आणि शास्त्रीय माहिती पोहोचावी; याकरिता अशा बर्ड रेसचे आयोजन केले जात असून, या माध्यमातून नव्या प्रजातीच्या पक्ष्यांचीदेखील ओळख होत असल्याचा दावा याद्वारे केला जात आहे.
मुंबईत बर्ड रेस; पक्षीमित्रांनी केल्या विविध प्रजातींच्या पक्ष्यांच्या नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 3:21 AM