'पक्षी फडफडायला लागला, की समजायचं नेम अचूक बसलाय'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 02:33 PM2020-03-02T14:33:10+5:302020-03-02T14:34:16+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली
मुंबई - महाविकास आघाडीवर टीका करण्याची भाजपा नेते एकही संधी सोडत नाही. मात्र, महाविकास आघाडीचे नेतेही त्याला जशास तसे प्रत्युत्तर देतात. रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षाला टोला लगावला. या शाब्दिक युद्धात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडें यांनीही उडी घेत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्यावर टीका केली. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, असे म्हणत मुंडेंनी शेलार यांना टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली असून त्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. त्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू, आहेत त्या 8 जागा टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येतं? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर, विनोदीच आहे सगळं, पालिकेत अबकी बार भाजपा सरकार अशा शब्दात एकाचवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टार्गेट केले होते. यावर, रोहित पवार यांच्यानंतर आता धनंजय मुंडेंनीही उत्तर दिलंय. पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, असे म्हटले आहे.
पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय... https://t.co/DtEgVUYXCd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 2, 2020
दरम्यान, भाजपाचे सुरुवातीला दोनच खासदार होते. आज केंद्रात तुमच्या पक्षासाठी आलेले अच्छे दिन हे तुमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत आणि राज्यातील तुमच्या पक्षासाठी आलेले बुरे दिन हे अशाच अहंकाराचं फळ आहे. असे म्हणत आता तरी सुधरा राव असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.