पक्षी सप्ताह : फळझाडे कमी झाल्याने पक्षी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 02:31 AM2019-11-08T02:31:25+5:302019-11-08T02:31:31+5:30
पक्षी सप्ताह : शहरीकरण, वृक्षतोड, अतिक्रमणाचाही परिणाम
मुंबई : वाढते शहरीकरण, वृक्षतोड, अतिक्रमण, सततचा पाऊस आणि महापुरामुळे पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. अलीकडे फळझाडांची संख्याही कमी झाल्यामुळे काही पक्षी हद्दपार झाल्याचे पक्षिमित्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुंबई बर्ड वॉचर्स क्लबचे संस्थापक आदेश शिवकर म्हणाले, शहरीकरणामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागे शहरीकरण हेच मुख्य कारण आहे. मुंबई हे समुद्राच्या किनारी वसलेले शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी बरेचसे पाणथळ प्रदेश होते. पाणथळ जागा विविध प्रकल्पांमुळे डेब्रिज टाकून बुजविली जात आहे.
हळूहळू पाणथळ प्रदेश नष्ट होऊन पक्ष्यांचा अधिवास कमी होऊ लागला आहे. रस्त्यांच्या कडेला तसेच बागेमध्ये पटकन वाढणारी किंवा सुंदर दिसणारी झाडे लावली जातात. यात गुलमोहर, रेन ट्री, कॉपर पॉट ट्री अशी विदेशी झाडे लावली जातात. स्थानिक पक्ष्यांना या झाडांचा काहीही उपयोग होत नाही. पूर्वी वड, पिंपळ, आंबा इत्यादी झाडे खूप असायची. ही झाडे फळ देत असून यांची वृक्षतोड झाल्यामुळे बहुतेक पक्षी हद्दपार झाले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये हल्ली कावळ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. इतर पक्षी कावळ्यापुढे तग धरून राहत नाहीत. त्यामुळे त पक्षी जंगलाच्या आत-आत जायला लागले, हेदेखील चांगले नाही.
पक्षिमित्र मंडळ (निफाड) अध्यक्ष, डॉ. उत्तमराव देरले म्हणाले, पक्ष्यांचा अधिवास वेगवेगळा असतो. पाण्यात, रानमळ्यात, इतर विविध ठिकाणी पक्षी राहतात. काही माळरान व पडीक जमिनी बांधकामासाठी नामशेष झाल्या. याशिवाय घुबड हे झाडांच्या बिळामध्ये राहतात. मात्र, वृक्षतोडीमुळे घुबडांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. मुंबईमध्ये पूर्वी मोठमोठी जंगले होती. तिथे आता अतिक्रमणांमुळे जंगले संकुचित होऊ लागली आहेत. आरेमध्ये झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. सततच्या पावसामुळे व पुरामुळे पक्ष्यांना वारंवार घरटी बांधावी लागत आहेत. नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांनी आतापर्यंत तीन वेळा घरटी बांधली़
पाणथळ होतेय नष्ट
च्मुंबई हे समुद्राच्या किनारी वसलेले शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी बरेचसे पाणथळ प्रदेश होते. पाणथळ जागा विविध प्रकल्पांमुळे डेब्रिज टाकून बुजविली जात आहे. पाणथळ प्रदेश नष्ट होऊन पक्ष्यांचा अधिवास कमी होऊ लागला आहे.