Join us

पक्ष्यांनाही असह्य होतोय सूर्यनारायणाचा कोप, ४४ पक्षी रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 7:07 AM

वाढत्या उन्हाळ्यामुळे मुंबईत माणसांसह पशुपक्षीदेखील हैराण झाले आहेत. वाढता उन्हाळा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी पक्षी भोवळ येऊन पडण्याच्या घटना घडत आहेत.

मुंबई  - वाढत्या उन्हाळ्यामुळे मुंबईत माणसांसह पशुपक्षीदेखील हैराण झाले आहेत. वाढता उन्हाळा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी पक्षी भोवळ येऊन पडण्याच्या घटना घडत आहेत. प्राणिपे्रमींनी बऱ्याच पक्ष्यांना परळ येथील बाई साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अ‍ॅनिमल (बैलघोडा रुग्णालय) येथे दाखल करून जीवनदान दिले आहे.गेल्या आठवड्याभरात भोवळ येऊन पडलेल्या ४४ पक्ष्यांना या रुग्णायलात दाखल करण्यात आले आहे. पक्ष्यांवर उपचार सुरू असून, बरे झालेले पक्षी रुग्णालयाच्या आवारातच बागडताना पाहायला मिळत आहेत.मुंबईचे तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. पारा ३६ ते ४१ अंश सेल्सिअसच्या घरात पारा पोहोचला आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांचे हाल होत आहेत. पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे पक्ष्यांना भोवळ येते. त्यामुळे झाडावर बसलेले, उडत असलेले पक्षी अचानक जमिनीवर पडतात. बैलघोडा रुग्णालयामध्ये सध्या २३ घारी, १८ कबुतरे, २ पोपट आणि एका कावळ्यावर उपचार सुरू आहेत. पक्षीप्रेमी व सुजाण नागरिकांनी या पक्ष्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली.साकरबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल फॉर अ‍ॅनिमलचे सहसचिव सुरेश कदम म्हणाले की, उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची जास्त आवश्यकता असते. पाण्याअभावी पक्षी बेशुद्ध पडतात. पक्ष्यांना वाचविण्यासाठी प्रत्येकाने घराची खिडकी, गॅलरी, गच्चीसारख्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवावे, तसेच कोठेही पक्षी बेशुद्धावस्थेत आढळल्यास, त्याला ग्लुकोजयुक्त पाणी द्यावे.

टॅग्स :मुंबईवन्यजीव