पक्ष्यांना शेव, चिवडा, फरसाण, खायला घालताय; खबरदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 02:03 AM2021-04-18T02:03:41+5:302021-04-18T02:12:43+5:30

पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा इशारा

The birds are fed with shev, chiwda, farsan,; Warning ... | पक्ष्यांना शेव, चिवडा, फरसाण, खायला घालताय; खबरदार...

पक्ष्यांना शेव, चिवडा, फरसाण, खायला घालताय; खबरदार...

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी स्थलांतरित परदेशी सीगल पक्ष्यांचे वास्तव्य आहे. मात्र मनोरंजनासाठी काही नागरिकांकडून पक्ष्यांना शेव, चिवडा, फरसाण, पाव, बिस्किटे असे खाद्य खाऊ घालण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. असे वागत असाल तर खबरदार, असा इशारा पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी दिला. यामुळे परिसर प्रदूषित हाेऊन वन्यजीव अधिवासाला क्षती पाेहाेचते असे त्यांनी सांगितले. 
 याबाबत काही पर्यावरणीय संस्था लोकशिक्षणाच्या माध्यमातून जनजागरणाचे काम करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना जरी सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी कार्यकर्त्यांची पाठ वळताच असे प्रकार सातत्याने घडतच आहेत, अशी खंत पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर समुद्र, तलाव व आसपासच्या परिसरात प्रदूषण करणे रोगराईला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य टाकणे कसे चुकीचे आहे याची माहिती देणारे प्रबोधनपर फलक मोक्याच्या जागांवर लावणे आवश्यक आहे. साेबतच सीसीटीव्ही लावून कायदेभंग करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक व इतर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. 
जनजागरण मोहिमेदरम्यान पक्ष्यांना खाद्य टाकण्यास कार्यकर्त्यांनी मज्जाव केल्यास काही नागरिकांबरोबर खटके उडण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. पक्ष्यांना व त्यांच्या अधिवासाला जाणीवपूर्वक धोका पोहोचविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई  झाली तरच अशा चुकीच्या गोष्टींना पायबंद बसेल, असे म्हणणे संबंधितांनी व्यक्त केले.

समुद्र, तलावातील जीवसृष्टीवर विपरीत परिणाम
भेळपुरी, सँडविच, दाबेली यासारखे पदार्थ खाऊन झाले की उरलेले निरुपयोगी खाद्य कचऱ्याच्या डब्यात न टाकता विहार करत असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांना सर्रास टाकले जात आहे. शेव, गाठी, फरसाण, पाव, बिस्किटे असे खाद्य समुद्र, तलावामध्ये फेकले जात आहे. काही नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणेच समुद्र, तलावातील जीवसृष्टीवर याचा विपरीत परिणाम होत आहे, असे आरे संवर्धन समितीचे रोहित जोशी यांनी सांगितले.
 

Web Title: The birds are fed with shev, chiwda, farsan,; Warning ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.