Join us  

पक्षांना लागली लॉबिंगची कीड

By admin | Published: February 04, 2017 4:26 AM

मुंबई महापालिका निवडणुकीत प्रथमच सर्वच प्रमुख पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी लपवून ठेवत अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म वाटण्याचा प्रताप

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत प्रथमच सर्वच प्रमुख पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी लपवून ठेवत अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म वाटण्याचा प्रताप केला आहे. सर्वच पक्षांमध्ये गटबाजी करत प्रमुख नेत्यांनी नातेवाईकांपासून स्वत:च्या गोटातील कार्यकर्त्यांना तिकीट मिळवून दिले आहे. त्याचा फटका प्रामाणिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना बसला आहे. काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्षाचा झेंडा हाती घेतला असून, काहीजण अद्यापही पक्षनिष्ठतेची पिपाणी वाजवण्यातच धन्यता मानत आहे.राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार राज पुरोहित आदींसह काही खासदार आणि आमदारांसारख्या दिग्गज नेत्यांनी आपल्या मुलांसाठी फिल्डींग लावत तिकीट मिळवले. मात्र घराणेशाही आणि गटबाजीची हीच कीड आता पक्षातील इतर नेत्यांमध्ये पसरू लागली आहे. ज्येष्ठ नेत्यांचे अनुकरण करत आजी-माजी नगरसेवक आणि पक्ष प्रवक्त्यांनीही जोरदार लॉबिंग करत आपल्या गोटातील कार्यकर्त्यांसाठी तिकीट मिळवले आहे. विभागावर आपले वर्चस्व कायम राहावे, हा त्यामागील एकमेव हेतू असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त केला आहे.भायखळ््यातील प्रभाग क्रमांक २०८ मधून शिवसेनेने सध्याचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाने राकेश जेजुरकर यांना उमेदवारी दिली आहे. जेजुरकर हे भाजपा प्रवक्ते मधु चव्हाण यांच्या गोटातील मानले जातात. काहीच महिन्यांपूर्वी ते याठिकाणी सक्रिय झाले आहेत. याउलट गेल्या २५ वर्षांपासून पक्षाचे अस्तित्त्व जिवंत ठेवणाऱ्या भाजपाचे जिल्हा सचिव अजित आंब्रे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी आंब्रे यांचा पत्ता कट करत पक्षाने जेजुरकर यांना उमेदवारी दिल्याने विभागातही आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून या प्रभागात माजी नगरसेविका सुनिता शिंदे यांचा मुलगा सुशांत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सुशांतच्या गळ््यात काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई प्रदेश उपाध्यक्षची माळ पडली होती. याठिकाणी राष्ट्रवादीचे मुंबई सचिव धनंजय बरदाडे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र भुजबळ कुटुंबियांद्वारे शिंदे यांनी वजन वापरत बरदाडे यांची उमेदवारी पळवल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात आहे. राष्ट्रवादीचे अस्तित्त्व संपवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला आहे.मनसेही गटबाजीच्या राजकारणापासून सुटू शकलेला नाही. निवडणुकांची घोषणा होईपर्यंत याठिकाणी विभागाध्यक्ष विजय लिपारे यांचे नाव निश्चित मानले जात होते. मात्र मनसेच्या नगरसेविका समिता नाईक यांचा प्रभाग फुटल्याने लिपारे यांची दावेदारी धोक्यात आली. नाईक यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर त्यांचे पती आणि मनसेचे उपाध्यक्ष व वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी तिकिटासाठी वर्णी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केल्याने नाईकांची उमेदवारी अडचणीत आली होती. अखेर पक्षातील वजन वापरत नाईक यांनी त्यांच्या गोटातील शाखाध्यक्ष किरण टाकळे यांना तिकीट देत लिपारे यांचा पत्ता कट केल्याचे मनसैनिकांमध्ये बोलले जात आहे. (प्रतिनिधी)एकाची तयारी, दुसऱ्याला उमेदवारीभांडुपमधील प्रभाग क्रमांक ११५ मधून मनसे उपविभागाध्यक्ष अनिल राजभोज यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनसेच्या महिला अध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी राजभोज यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले होते. मात्र स्थानिक नगरसेविका वैष्णवी सरफरे यांना पुन्हा संधी मिळाल्याने राजभोज यांनी बंडखोरी केली. शिवाय राजभोज यांनी पत्नी ज्योती यांना प्रभाग क्रमांक ११३ मधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले आहे.उत्तरपूर्व मुंबईत निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्याने आलेल्या उमेदवारांना संधी दिल्याच्या रागातून भाजपांतर्गत वाद वाढत आहेत. मुलुंडमध्ये भाजपा आमदार सरदार तारासिंग यांचा मानसपुत्र तसेच मुलुंड भाजपा महामंत्री विरल शहा यांनी बंडखोरी करत पत्नी वैशाली यांचा १०७ मधून उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाने तयारी करायला सांगितली, मात्र उमेदवारी दुसऱ्यालाच दिल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.अपक्षांची मांदियाळीकाँग्रेस पक्षाने तिकीट दिले नसल्यामुळे प्रभाग क्रमांक ७४ मधून बंडखोरी करत सुरक्षा घोसाळकर यांनी अपक्ष अर्ज भरला.शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने प्रभाग क्रमांक ७७ मधून दत्ता शिरसाट यांनी अपक्ष अर्ज भरला.प्रभाग क्रमांक ४१ मध्ये माजी शाखाप्रमुख तुळशीराम शिंदे यांनी सेनेविरोधात बंडखोरी करत अपक्ष अर्ज सादर केला.माजी विभागप्रमुखाची बंडखोरी! : शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी घाटकोपरच्या १२३ प्रभागातून बंडखोरी केली आहे. मोरे यांनी स्वत:च्या भावजय रिटा मोरे यांसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकीट नाकारत सेनेने स्थानिक नगरसेविका डॉ. भारती बावदाने यांना पुन्हा एकदा संधी दिली. परिणामी, मोरे यांनी बंडखोरी करत रिटा यांना अपक्ष म्हणून उभे केले आहे.