मुंबई : भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीनवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. एमटीडीसीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांमुळे विदर्भातील दुर्लक्षित पर्यटनस्थळांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.पटोले यांनी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला भेट देऊन एमटीडीसीच्या या उपक्रमाची पाहणी केली, त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी जी. पी. मीना, गजानन जोशी आदी उपस्थित होते. राज्यातील व देशातील इतर रेल्वे एक्स्प्रेसवरही महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची प्रसिद्धी करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.उपक्रमाविषयी माहिती देताना एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले, डेक्कन क्वीन रेल्वे महाराष्ट्राचा मानबिंदू असून तिच्या १७ बोगींवर ही चित्रे लावण्यात आली आहेत. महाराष्ट्रात एमटीडीसीची विविध ठिकाणी २३ पर्यटक निवासे आहेत. या परिसरातील पक्ष्यांची व निसर्गाची चित्रे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या बाह्य भागावर लावून या पर्यटक निवासाची प्रसिद्धी करण्यात येत आहे. या माध्यमातून पर्यटकांना नागझिरा अभयारण्य तसेच विदर्भाकडे आकर्षित करून तेथील पर्यटनाला चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
नागझिऱ्यातील पक्षी, निसर्गाची चित्रे ‘डेक्कन क्वीन’वर अवतरली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:47 AM