Join us

सर्पमित्राच्या घरात नागिणीच्या १८ पिलांचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:06 AM

मुंबई : चेंबूर येथे राहणाऱ्या अमान खान या सर्पमित्राच्या घरात नागिणीच्या १८ पिलांचा जन्म झाला आहे. १४ मे रोजी ...

मुंबई : चेंबूर येथे राहणाऱ्या अमान खान या सर्पमित्राच्या घरात नागिणीच्या १८ पिलांचा जन्म झाला आहे. १४ मे रोजी सर्पमित्र अमान याने चेंबूर मधून एका नागिणीची सुटका केली होती. यावेळी घटनास्थळी ही नागीण अत्यंत अशक्त अवस्थेत आढळून आली होती. त्यावेळी तिला हालचाल करणे देखील शक्य होत नव्हते. त्यामुळे अमान याने या नागिणीला काही वेळा करिता आपल्या चेंबूर येथील घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

घरी नेताच त्या नागिणीने १८ अंडी दिली. यावेळी नागीण अत्यंत अशक्त असल्याने तिला उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र अमान याने तिची १८ अंडी घरातच कृत्रिमरीत्या उबविण्याचा निर्णय घेतला. तब्बल दीड महिने नागिणीची अंडी घरातच कृत्रिमरीत्या उबविल्यानंतर मागील आठवड्यातच त्या अंड्यांमधून १८ पिल्ले बाहेर आली. या सर्व पिलांची प्रकृती सुदृढ होती. यावेळी अमान याने वनविभागाला याची माहिती देत या अठरा पिल्लांची सुखरूपपणे निसर्गाच्या सानिध्यात सुटका केली. पावसाच्या दिवसात मुंबई परिसरात अनेक ठिकाणी साप आढळून येण्याच्या घटना घडत आहेत. अशावेळी या सापांना न मारता सर्पमित्रांना पाचारण करून त्या सापांना जीवनदान देण्यात यावे, असे आवाहन सर्पमित्र करत आहेत.