मालमत्ता कर भरला तरच जन्म-मृत्यू दाखला
By admin | Published: July 5, 2014 12:01 AM2014-07-05T00:01:14+5:302014-07-05T00:01:14+5:30
मुंब्य्रातून मालमत्ता कराची सुमारे ४० कोटींच्या थकबाकीची वसुली व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने जन्म किंवा मृत्यू दाखला हवा असेल तर मालमत्ता कर भरा, अशा आशयाचे परिपत्रक काढले आहे
ठाणे : मुंब्य्रातून मालमत्ता कराची सुमारे ४० कोटींच्या थकबाकीची वसुली व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने जन्म किंवा मृत्यू दाखला हवा असेल तर मालमत्ता कर भरा, अशा आशयाचे परिपत्रक काढले आहे. परंतु, परिपत्रकातील याच मुद्द्यावरून शुक्रवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीत सदस्यांनी तो मुद्दा परिपत्रकातून वगळण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. तसेच हे परिपत्रक काढणाऱ्या संबंधित सहायक आयुक्तावर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. अखेर, प्रशासनाने परिपत्रकातील हा मुद्दा काढून टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदस्य शांत झाले.
मुंब्य्रातून मालमत्ता करापोटी गेल्या पाच वर्षांपासूनची सुमारे ४० कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीची वसुली करण्यासाठी मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सागर घोलप यांनी हे परिपत्रक काढले आहे. यात जन्म आणि मृत्यूच्या दाखल्याबरोबरच विविध स्वरूपाचे दाखले, नळजोडणी, नवीन कनेक्शन आदींचा यात उल्लेख करण्यात आला होता. परंतु, पालिकेच्या या परिपत्रकाचा समाचार स्थायी समिती सदस्यांनी घेतला. स्थानिक नगरसेवक सुधीर भगत यांनी जोपर्यंत एखादा मालमत्ताधारक मालमत्ता कर भरणार नाही, तोपर्यंत त्याला जन्म अथवा मृत्यू दाखला दिला जाणार नाही का, असा सवाल उपस्थित केला. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीही याला विरोध करून कोणत्या नियमानुसार, कायद्यानुसार हे परिपत्रक काढले, असा सवाल केला. यावर अतिक्रमण उपायुक्त के.डी. निपुर्ते यांनी जन्म-मृत्यूची नोंदणी केली जात असल्याचे सांगून केवळ मालमत्ताधारकांची थकबाकी किती आहे, ती भरली आहे की नाही, त्याची पावती दाखवली तरच त्यांना तो दाखला दिला जात असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)