Join us

कामा रुग्णालयात तिळ्यांचा जन्म

By admin | Published: November 03, 2015 1:33 AM

मुदतीच्या आधी जन्माला आलेल्या तिळ्यांचे वजन १ ते १.५ किलोदरम्यान असूनही तिळे सुखरूप आहे. वीस दिवस कामा रुग्णालयातील शुश्रूषेमुळे मुलांच्या वजनात वाढ होऊन

मुंबई : मुदतीच्या आधी जन्माला आलेल्या तिळ्यांचे वजन १ ते १.५ किलोदरम्यान असूनही तिळे सुखरूप आहे. वीस दिवस कामा रुग्णालयातील शुश्रूषेमुळे मुलांच्या वजनात वाढ होऊन आई व तिन्ही बाळांना शनिवारी घरी सोडण्यात आले. कल्याण आंबिवली येथे राहणाऱ्या २६ वर्षीय मुमताज तांबोळे हिने १० आॅक्टोबर रोजी तिळ्यांना जन्म दिला. मुमताज हिला पहिला मुलगा आहे. दुसऱ्या प्रसूतीवेळी मुमताजला तिळे झाले. तिळ्यांमध्ये दोन मुली आणि एक मुलगा आहे. प्राथमिक तपासण्यांवेळी मुमताजला तिळे असल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला आहाराकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले होते. कारण, तिळे असल्यावर हिमोग्लोबिन, प्रोटिनची कमतरता भासण्याचा धोका अधिक असतो. बहुतांश तिळे असणाऱ्या महिलांची प्रसूती मुदतीपूर्वीच होते. मुमताजनेही तीन बाळांना ३२ व्या आठवड्यात जन्म दिला, असे कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी दिली. मुमताजचे सिझेरियन करण्यात आले. तिळ्यातील पहिल्या मुलीचे वजन १.१ किलो, दुसऱ्या मुलीचे वजन १ किलो तर तिसऱ्या मुलाचे वजन १.५ किलो एवढे होते. बाळांची वजने कमी असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्यामुळे जन्माला आल्यावर बाळांना ‘निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिट’मध्ये ठेवण्यात आले. डॉ. सुभाष वालिसकर यांच्या युनिट अंतर्गत हे तिळे देखरेखीखाली होते, असे डॉ. कटके यांनी सांगितले. दोघा बाळांना मेनिंजायटिस झाला होता, तर एका बाळाला पोटात संसर्ग झाला होता. हा संसर्ग वाढला असता तर त्या बाळाला अल्सरचा त्रास होण्याचा धोका होता. पण तिन्ही बाळांना योग्य ती औषधे देण्यात आली. योग्य शुश्रुषेमुळे बाळांच्या वजनात वाढ झाली. (प्रतिनिधी)त्याबरोबर तिन्ही बाळांना आईचे दूध आणि मिल्क बँकमधील दूध देण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना योग्य वेळी दूध देण्याची आवश्यकता होती. प्रत्येक दोन तासांनी बाळांना दूध पाजण्यात येत होते. थोड्याच दिवसांत बाळांची प्रकृती सुधारायला लागली. घरी सोडताना पहिल्या मुलीचे वजन २.८ किलो, दुसऱ्या मुलीचे वजन २.१९ किलो आणि तिसऱ्या मुलाचे वजन २.३० किलो इतके झाले होते. त्यांच्या सर्व तपासण्या सामान्य आल्याचे डॉ. वालिसकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)प्रसूती यशस्वी झाल्याचा आनंदनैसर्गिकरीत्या तिळे होणे ही दुर्मीळ बाब आहे. १० हजार प्रसूतींमागे एक तिळे होण्याची शक्यता असते. तिळे असताना प्रसूती अत्यंत जिकिरीची ठरते. तिन्ही बाळांची नेमकी पोझिशन पाहूनच प्रसूती करावी लागते. बहुतांश तिळ्यांची प्रसूती मुदतीपूर्वीच होते. तिळ्यांची प्रसूती अवघड होते. पण याआधीही कामा रुग्णालयात तिळ्यांची प्रसूती केली आहे. ही प्रसूतीही यशस्वी झाल्याचा आनंद आहे. बाळाचे आई, बाबा दोघेही खूश आहेत. - डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय