Join us

वाढदिवस पोलिसांच्या ‘मम्मी’चा

By admin | Published: January 04, 2016 2:15 AM

घरात एकट्या राहत असलेल्या वृद्धांसाठी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. हाच मदतीचा हात त्या वृद्धांसाठी जिव्हाळ्याचा ठरत आहे

मुबई : घरात एकट्या राहत असलेल्या वृद्धांसाठी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. हाच मदतीचा हात त्या वृद्धांसाठी जिव्हाळ्याचा ठरत आहे. गेली २० वर्षे माटुंगा पोलिसांच्या सहवासात असलेल्या ८० वर्षीय ललिता सुब्रमण्यम यांचा वाढदिवस मोठ्या थाटात पार पडला. सध्या त्यांची ओळख माटुंगा पोलीस ठाण्याची ‘मम्मी’ म्हणून केली जात आहे. माटुंगा परिसरात सुब्रमण्यम एकट्याच राहत आहेत. पतीच्या निधनानंतर दोन्ही मुले कामानिमित्त परदेशात स्थायिक झाली. अशात त्यांनी मदतीसाठी माटुंगा पोलिसांचा आधार घेतला. गेली २० वर्षे ते माटुंगा पोलिसांच्या संपर्कात असल्याने, माटुंगा पोलीस ठाण्याची त्यांची घट्ट नाळ जोडली गेली आहे. पोलीस ठाण्याच्या लाडक्या मम्मी म्हणून ओळख असलेल्या सुब्रमण्यम यांच्यासोबत दोन ते तीन दिवसांतून एक पोलीस अधिकारी त्यांची भेट घेत असतात. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी.एम. काकड यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. शनिवारी त्यांच्या राहत्या घरात पोलिसांच्या उपस्थित त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पोलिसांच्या या आपलेपणाच्या भावनेने सुब्रमण्यमही भारावून गेल्या होत्या. माटुंगा पोलिसांच्या या प्रयत्नाचे पोलीस दलात कौतुक केले जात आहेत. तरुणांनी यातून प्रेरणा घेत, ज्येष्ठांसाठी एक पाऊल पुढे यावे, असे आवाहनही माटुंगा पोलिसांकडून यावेळी करण्यात आले.