Ganpatrao Deshmukh Birthday: ज्यांच्या पायावर डोकं ठेवून कार्यकर्ते म्हणाले, 'आबा, तुम्हीच निवडणूक लढा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:58 PM2020-08-10T12:58:31+5:302020-08-10T15:22:37+5:30
गणपतराव देशमुख यांनी पहिली निवडणूक १९६२ साली जिंकली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर सुरू केलेला आपला राजकीय प्रवास त्यांनी शेवटच्या निवडणुकांपर्यंत कायम ठेवला.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणता ज्यांनी तब्बल 11 वेळा एकाच पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवून आणि जिंकून इतिहास घडवला त्या ज्येष्ठ नेत्याने आज 94 व्या वर्षात पदार्पण केलंय. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या त्यांच्या मूळ आज त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे. यंदाच्या वाढदिवसावर कोरोनाचं सावट असूनही कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात त्यांच्या उंदड आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळेस विजयी झालेले ज्येष्ठ आमदारगणपतराव देशमुख हे फडणवीस सरकारमधील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. मात्र, यंदाच्या विधानसभेला निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
गणपतराव देशमुख यांनी पहिली निवडणूक १९६२ साली जिंकली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर सुरू केलेला आपला राजकीय प्रवास त्यांनी शेवटच्या निवडणुकांपर्यंत कायम ठेवला. ना कधी लोभाला बळी पडले, ना कधी पदाला... ना कधी मंत्रीपदाची अपेक्षा केली, ना कधी महामंडळाचं स्वप्न पाहिलं. केवळ आपलं काम आपल्या माणसांसाठी निस्वार्थपणे करण्याचं कर्तव्य त्यांनी बजावलं. नि:स्पृहता, प्रामाणिकपणा, लोकनिष्ठा आणि निष्कलंक चारित्र्य हीच गणपत आबांची आयुष्यभराची कमाई. काल-परवापर्यंत फाटका दिसणारा कार्यकर्ता आमदार झाला की अल्पावधीत कोट्यधीश होतो, गाड्यांचा ताफा, दलालांची गर्दी त्याच्या भोवताल असते. हे चित्र सर्वच राजकीय पक्षांत दिसते. अशा निराशेच्या काळातही गणपतराव देशमुख नावाचा हा नि:स्पृह लोकप्रतिनिधी आपले जीवनमूल्य आणि सत्व टिकवून आहे. प्रामाणिक माणसाचा सार्वजनिक जीवनातील तोच नैतिक आधारही आहे. ‘आमदार गणपतराव देशमुख’ तुमचे निरलस आयुष्य आमच्यासाठी दंतकथेचा विषय आहे. म्हणूनच, यंदाची विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करताच, कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
आमदारकीच्या तिकीटासाठी स्पर्धा लागते, सौदेबाजी होते, कार्यकर्त्यांमध्ये राजी-नाराजी असते. मात्र, गणपत आबाच्या नेतृत्वाला स्पर्धाच नव्हती. त्यांची स्पर्धा ही स्वत:शीच, तीही दरवर्षी आमदारकीची टर्म वाढवणारी. गणपतराव यांच्या साधेपणाचे अनेक किस्से मीडियात रंगतात. सांगोल्याची जनता या वयोवृद्ध आमदारांवर, आपल्या लाडक्या नेत्यावर जीवापाड प्रेम करते. सांगोल्यातील मेळाव्यात जनतेचं हे प्रेम दिसून आलं होतं. विधानसभा निवडणुकांचे वेध राज्यातील सर्वच पक्षांना लागले आहेत. त्यासाठी, उमेदवारांची चाचपणी आणि पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, आपल्या वयाचे आणि प्रकृतीचे कारण देत सांगोल्यातून यंदा मी निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. मात्र, कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा गणपत आबांनाच उमेदवारी घेण्याचा आग्रह केला. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपतराव देशमुख यांच्या पायावरच डोकं ठेवलं. आबा, काहीही झालं तरी यंदाही तुम्हीच निवडणूक लढवा असं म्हणत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचंही महाराष्ट्राने पाहिलं. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी भावुक केललं हे वातावरण पाहून गणपतराव देशमुखही गहिरवले होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचे भवितव्य काय? भविष्यात शेकापचे तत्त्वज्ञान तालुक्यात टिकले पाहिजे. यासाठी मी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यावेळी गणपत आबांनी म्हटलं होतं. सध्याच्या राजकीय काळात आज या पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात उड्या मारणारी नेतेमंडळी आहे. मात्र, गणपत देशमुख यांनी ज्या पक्षानं आपल्या आमदार केलं. त्या पक्षाचं नाव टिकून राहावं म्हणून नव्या चेहऱ्याला संधी दिली. गणपत आबांसारखा नेता दुर्मिळचं, असा आमदार होणे नाही.