Join us

बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:43 AM

खासगी विकासकाला कामे देण्याचा निर्णय महागात पडल्यानंतर, महापालिका प्रशासनाने आता स्वत:च माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळींचा पुनर्विकास करण्याची तयारी केली आहे. विद्यमान विकासकाचा प्रस्ताव रद्द करण्यास पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर, पुनर्विकासासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या धोकादायक इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.

मुंबई  - खासगी विकासकाला कामे देण्याचा निर्णय महागात पडल्यानंतर, महापालिका प्रशासनाने आता स्वत:च माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळींचा पुनर्विकास करण्याची तयारी केली आहे. विद्यमान विकासकाचा प्रस्ताव रद्द करण्यास पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर, पुनर्विकासासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या धोकादायक इमारतींची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे.सन २००८ मध्ये महापालिकेच्या सुधार समितीने बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानुसार, इमारत क्रमांक १, २, ६ ते १६ या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम रबरवाला या विकासकाला देण्यात आले. त्यामुळे काही रहिवाशांना तिथेच संक्रमण शिबिरात जागा देऊन पुनर्विकासासाठी पाच इमारती तोडण्यात आल्या. त्यापैकी एका इमारतीची दुरुस्ती करण्यात आली आहे, तर इतर इमारती धोकादायक स्थितीत आहेत.या इमारतींचा पुनर्विकास सुरू करण्यात आल्याने, महापालिकेने यापूर्वीच चाळींची दुरुस्ती व पायाभूत सुविधांसाठी निधी वापरणे बंद केले आहे. त्यामुळे या चाळींची दुरवस्था झाली आहे. याबाबत आयुक्त अजय मेहता यांच्या दालनात नोव्हेंबर २०१७ मध्ये बैठक झाली होती. मात्र, विकासकाचे काम ठप्प असल्याने, अखेर हा प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याचे मालमत्ता विभागाने संबंधित विकासकाला गेल्या आठवड्यात नोटीसद्वारे कळविले आहे.अखेर मिळाला दिलासा...माझगाव ताडवाडी येथील १६ चाळींमध्ये राहणाऱ्या १ हजार ३६२ रहिवाशांपैकी १८० रहिवाशांना तेथेच संक्रमण शिबिर बांधून देण्यात आले. त्यानंतर, धोकादायक ठरलेल्या पाच इमारती पाडून २२० रहिवाशांची रवानगी माहुल येथील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीत करण्यात आली आहे. या रहिवाशांचे हाल होत असल्याने, त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी पालिकेनेच पुनर्विकास करण्याची आपली मागणी आहे. ही मागणी आयुक्तांनी मान्य केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.तातडीने दुरुस्ती...या इमारतींची दुरवस्था झाल्यामुळे तातडीने दुरुस्तीची गरज आहे. याबाबत मालमत्ता विभागाने स्थानिक विभागाला सूचित केले असल्याचे एका पालिका अधिकाºयाने सांगितले. या इमारतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लवकरच सादर होणार आहे.विकासकाचे इरादा पत्र रद्द करण्यात आल्याने, हा पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. पालिकेच्या महासभेनेही हा प्रकल्प रद्द केल्यानंतर, महापालिकेमार्फत बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचा निर्णय होईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईघर