गेट वे आॅफ इंडियावर रंगला ‘बिटिंग रिट्रीट’ सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:57 AM2018-12-05T00:57:01+5:302018-12-05T00:57:08+5:30

कान तृप्त करणारे नौदलाचे बँड पथक, सी-कॅडेट कॉर्प्सचे नृत्य, मार्कोस कमांडोंची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि चेतक, सी-किंग हेलिकॉप्टर्सच्या कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली.

'Biting Retreat' celebrated on Get Way of India | गेट वे आॅफ इंडियावर रंगला ‘बिटिंग रिट्रीट’ सोहळा

गेट वे आॅफ इंडियावर रंगला ‘बिटिंग रिट्रीट’ सोहळा

Next

मुंबई : तिरंग्याच्या रोशणाईने न्हाऊन निघालेले ‘गेट वे आॅफ इंडिया’चे प्रांगण, शुभ्र पांढऱ्या रंगाच्या गणवेशात शिस्तबद्ध संचलन करणारे जवान, लयबद्ध कवायती करत, कान तृप्त करणारे नौदलाचे बँड पथक, सी-कॅडेट कॉर्प्सचे नृत्य, मार्कोस कमांडोंची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि चेतक, सी-किंग हेलिकॉप्टर्सच्या कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते नौदलाच्या बिटिंग रिट्रीट सोहळ्याचे.
भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाने नौदल दिनानिमित्त मंगळवारी सायंकाळी आयोजित केलेल्या ‘बिटिंग रिट्रीट’ समारोहास राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांच्यासह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नौदलाच्या चेतक आणि सी-किंग हेलिकॉप्टरने विविध रचनांमध्ये हवाई कसरती केल्या. गेट वे आॅफ इंडियाच्या मागून सी-किंग हेलिकॉप्टर झेपावले आणि त्यातून दोरीवरून लटकत जवानांनी तिरंगा फडकावला. या वेळी त्यांनी केलेली पुष्पवृष्टी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती, तर हेलिकॉप्टरवरून दोरीच्या साहाय्याने लटकत जवानांनी दाखविलेल्या कसरती, कमांडोंची प्रात्यक्षिके या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये ठरली. नौदलाच्या बँडपथकाने लयबद्ध आणि शिस्तबद्धरीत्या संचलन करत केलेले वादन उपस्थितांची क्षणाक्षणाला दाद मिळवित होते. टॅटूपथकाने वादन करताना अंधाराच्या पार्श्वभूमीवर वाद्यांना लावलेल्या रंगीत दिव्यांची हालचाल प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होती. सोहळ्याच्या शेवटी गेट वे आॅफ इंडियाच्या मागे समुद्रामध्ये लांबवर रोशणाईत आयएनएस मुंबई, आयएनएस ब्रह्मपुत्रा आदी युद्धनौकांचे दर्शन घडविण्यात आले.

Web Title: 'Biting Retreat' celebrated on Get Way of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.