मुंबई - महापालिकेच्या जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे या ट्रॉमा केअर रुग्णालयात कोमात असलेल्या परविंदर गुप्ता या तरुणाच्या डोळ्याला काही दिवसांपूर्वी उंदराने चावा घेतला होता. या तरुणाचा गुरुवारी संध्याकाळी ३ वाजता मृत्यू झाला.कोमातील परविंदरला काही दिवसांपूर्वी आयसीयूतून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते. पण, त्याच दिवशी त्याच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचा आरोप त्याचे वडील रामप्रसाद गुप्ता यांनी केला होता. हात दुखत असल्याच्या कारणामुळे तब्बल ४० दिवस परविंदर गुप्तावर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांनंतर डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर तो कोमात गेल्याचे त्याचा भाऊ अक्षय गुप्ताने सांगितले. त्या रुग्णालयात बिल जास्त झाल्याने त्याला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले.आयसीयूच्या साफसफाईचे कारण देत परविंदरला जनरल वॉर्डमध्ये हलविले तेव्हाच त्याच्या डोळ्याला उंदराने चावा घेतला होता. पण, रुग्णाला उंदराने चावा घेतल्याचा कोणताच पुरावा नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले होते. परविंदरचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
उंदराने डोळ्याला चावा घेतलेल्या रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 5:59 AM