"...कटू पण सत्य आहे", मुलुंडमधील घटनेवरून जितेंद्र आव्हाडांचा मराठी लोकांना अप्रत्यक्षरित्या टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 02:00 PM2023-09-28T14:00:48+5:302023-09-28T15:46:10+5:30

एका मराठी महिलेला मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये जागा नाकारल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे.

"...bitter but the truth is", jitendra awhad indirect message to the Marathi people on the incident in Mulund | "...कटू पण सत्य आहे", मुलुंडमधील घटनेवरून जितेंद्र आव्हाडांचा मराठी लोकांना अप्रत्यक्षरित्या टोला 

"...कटू पण सत्य आहे", मुलुंडमधील घटनेवरून जितेंद्र आव्हाडांचा मराठी लोकांना अप्रत्यक्षरित्या टोला 

googlenewsNext

मुंबई : एका मराठी महिलेला मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये जागा नाकारल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. या घटनेतील पीडित महिला तृप्ती देवरुखकर यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्टवर व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये महाराष्ट्रीयन लोकांना सोसायटीत प्रवेश नसल्याची मुजोरीची भाषा सोसायटीच्या सेक्रेटरीने केल्याचे सांगितले. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या महिलेची अडचण समजून याबाबत सोसायटीच्या सेक्रेटरीला मनसे स्टाईलमध्ये जाब विचारला. मनसेच्या दणक्यानंतर अरेरावी करणाऱ्या सेक्रेटरीला माफी मागायला लागली.

या घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, "हा एवढा माज कुठून आला? मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यापुरता हा विषय नाही. आणखी बरेच काही आहे. हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मिंदे महा मंडळाने द्यायला हवे. भाजपानेशिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी. मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले. तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. जय महाराष्ट्र", असा म्हणत संजय राऊत यांनी भाजपा-शिंदे गटावर हल्लाबोल केला.

दुसरीकडे, या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरित्या मराठी लोकांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, "मराठी महिलेला घर नाकारले म्हणून गुजराती लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारवाडी, जैन, गुजराती हाउसिंग सोसायटीमध्ये मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून घरे मिळत नाहीत. मुंबईत हे सगळ्यांना माहितीच आहे. मुलुंडमधील घटनेनंतर गुजराती लोकांना हाकलून लावा, अशा कमेंटचा पाऊस न्यूज खाली पडला. हेच मराठी लोक जात पाहून शेडुल्ड कास्ट लोकांना घरे नाकारतात. धर्म पाहून मुसलमानांना घर नाकारतात. शेरास सव्वाशेर... गुजराती, मारवाडी, जैन हे मराठी लोकांना जेव्हा लाथ घालतो, तेव्हा हे किंचाळतात. कटू पण सत्य आहे."

दरम्यान, या घटेनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य महिला आयोगाने देखील घेतली आहे. "कुणाची अशी मक्तेदारी चालू देणार नाही. असा प्रकार महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही. जर यात तथ्य असेल तर गंभीरतेने नोंद घेऊ. मराठी माणसाचा असा अपमान करण्याचं धाडस होणार नाही अशी भूमिका घेऊ. महाराजांच्या भूमीत हे घडत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. नेमकं तिथं काय झालं याची माहिती घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल", असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.

नेमकं काय घडलं?
तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या. मुलुंडमधील शिवसदन सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता तिथे त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही, असे सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितले. मात्र याबाबत तृप्ती यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तृप्ती यांना सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. यावेळी त्यांना मराठी माणसांच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्याला सर्वच राजकीय पक्षांना फटकारले होते.
 

Web Title: "...bitter but the truth is", jitendra awhad indirect message to the Marathi people on the incident in Mulund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.