रणवीरवरील स्फोटाने जागविल्या कटु आठवणी; दुर्घटनांमुळे नौदल प्रमुखांनी दिला होता राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:37 AM2022-01-20T09:37:55+5:302022-01-20T09:38:17+5:30
अलीकडच्या काळात मोठ्या अपघातांमध्ये लक्षणीय घट पहायला मिळाली. तरी, छोट्या किरकोळ स्वरूपाच्या सहा घटनांची नोंद झाली.
मुंबई : नौदलाच्या मुंबई गोदीचा आणि दुर्घटनांचा एक दुर्दैवी संबंध अलीकडच्या काळात तयार झाला आहे. आयएनएस रणवीरवरील स्फोटाने भूतकाळातील दुर्घटनांच्या कटु आठवणी जाग्या झाल्या आहेत. पाणबुडीच्या दुर्घटनेनंतर तर तत्कालीन नौदल प्रमुखांनी पदाचा राजीनामा दिला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील नौदल प्रमुखाने पदमुक्त होण्याची ही एकमेव घटना होती. पूर्व ताफ्यातील विनाशिकेवर मोहिमेनंतर परतीच्या तयारीत असताना स्फोट झाल्याने मुंबईत का दुर्घटना होतात, या प्रश्नाने डोके वर काढले आहे. जगभरात नौदल गोदीत तसेच नौदलाच्या जहाजांच्या दुर्घटनांचा मोठा इतिहास आहे. काही वर्षांपर्यंत मुंबई गोदीत सातत्याने अपघात होत होते. अलीकडच्या काळात मोठ्या अपघातांमध्ये लक्षणीय घट पहायला मिळाली. तरी, छोट्या किरकोळ स्वरूपाच्या सहा घटनांची नोंद झाली.
२०१४ मध्ये आयएनएस कोलकात्तावर वायू गळतीची घटना घडली. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नव्हती.
२०१४ मध्येच आयएनएस सिंधुरत्न या पाणबुडीला लागलेल्या आगीत दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
२०१४ मध्ये आयएनएस बेतवा मुंबई बंदराकडे येत असताना दुर्घटनाग्रस्त झाली आणि त्यावरील सोलार यंत्रणा ठप्प झाली.
२०१३ मध्ये आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवर स्फोट झाला. यात ११ जणांचा मृत्यू झाला.
२०११ मध्ये आयएनएस विंध्यगिरी दुर्घटनाग्रस्त झाल्याने तळाशी गेली.
‘सिंधुरत्न’च्या दुर्घटनेनंतर तत्कालीन नौदल प्रमुख ॲडमिरल डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला.