Join us

भिवंडी न्यायालयातील काम वकील सोमवारी ठेवणार बंद

By admin | Published: March 16, 2015 1:58 AM

भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या सभोवतालच्या परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना लक्षात घेऊन कोर्टाच्या आवारात सुरक्षिततेच्या

भिवंडी : भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयांच्या सभोवतालच्या परिसरात घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना लक्षात घेऊन कोर्टाच्या आवारात सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी भिवंडी बार कौन्सिलच्या वकिलांनी केली आहे. उत्तर प्रदेशमधील कोर्टात घडलेल्या घटनेमुळे बार कौन्सिल आॅफ इंडियाने जाहीर केल्यानुसार सोमवारी १६ मार्च रोजी वकीलवर्ग न्यायालयातील आपले काम बंद ठेवणार असल्याची माहिती भिवंडी बार कौन्सिलच्या वकिलांनी दिली.शहरातील न्यायालयात ग्रामीण व शहरी भागांतून कोर्टाच्या कामासाठी वादी व प्रतिवादीसह अन्य सहकारी येत असतात. तसेच पोलीसही विविध गुन्ह्यांतील आरोपींना आणतात. कधी कोर्टाच्या आवारात तर कधी कोर्टाच्या सभोवतालच्या परिसरात वादविवाद, भांडणे होत असतात. कोर्टातील कामकाज आटोपून निघालेल्या व्यक्तीवर कोर्टाबाहेर चाकूहल्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. तसेच फिर्यादीने केलेली तक्रार मागे घेण्यासाठीदेखील फिर्यादीवर दबाव टाकण्याच्या घटना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या घडत असतात. त्यामुळे फिर्यादी बिथरतात. अशा विविध प्रसंगी सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांचे संरक्षण आवश्यक असते. याकरिता कोर्टाच्या आवारात पोलीस असणे आवश्यक बाब बनली आहे.तसेच कोर्टात कामकाजाच्या वेळी सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी भिवंडी बार असोसिएशनचे वकील नियाज मोमीन, प्रसाद शेपाळ, हर्षल पाटील, वैभव भोईर यांनी केली आहे. उत्तर प्रदेशमधील कोर्टात झालेल्या गोळीबारात वकिलाचा मृत्यू झाल्याने न्यायालयीन कामकाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार सोमवारी वकिलांनी कोर्टातील आपले काम बंद ठेवावे, असे आवाहन भिवंडी बार कौन्सिलचे अध्यक्ष नारायण अय्यर यांनी सर्व सभासदांना केले आहे. (प्रतिनिधी)