Join us  

लोकसभेत भाजप ३७० पार तर एनडीए ४०० पार, पूर्ण ताकदीने कामाला लागा जे. पी. नड्डा यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 5:35 AM

जे. पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान अंधेरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, पुढील १०० दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांच्या काळात देशाला प्रगतीच्या दिशेने नेले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील विकसित भारताचा १० वर्षांचा काळ आपण पाहिला हे आपले सौभाग्य आहे. ही लोकसभेची लढाई केवळ जिंकण्यासाठी नाही तर मोठ्या फरकाने आपल्या जागा निवडून आणण्यासाठी आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविणे हा मोदी सरकारसाठी भावनात्मक विषय असून त्याच आधारावर भाजपच्या देशभरात ३७० जागा निवडून आणायच्या आहेत. देशात एनडीए ४०० पार करण्यासाठी मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुंबईतील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात केले.

जे. पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान अंधेरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, पुढील १०० दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांच्या काळात देशाला प्रगतीच्या दिशेने नेले आहे. त्याच आधारावर तिसऱ्यांदा देशातील जनता मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सज्ज झाली आहे.

 मतदारांना भेटा, त्यांच्यापर्यंत मोदींचे विकासाचे राजकारण पोहोचवा. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई भाजपाची निवडणूक संचलन समिती तसेच मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांच्या दोन क्लस्टरच्या बैठका अशा एकूण तीन बैठका नड्डा यांनी मुंबई भाजप कार्यालयात घेतल्या. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, संचालन समितीचे समन्वयक आ. अतुल भातखळकर, मुंबईतील भाजपचे खासदार आमदार प्रमुख पदाधिकारी आदी उपस्थित होते.

दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है : देवेंद्र फडणवीस

 मोदींनी मजबूत भारत जगासमोर आणला. मेट्रो, वंदे भारत ट्रेन, रस्ते या विकासकामांबरोबरच शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काम करून एक मजबूत भारत घडवला. विकासाची ही १० वर्षे फक्त ट्रेलर होता. पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असून छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने पुढील पाच वर्षे ही देशाला प्रगतीच्या वाटेवर अधिक पुढे नेणारी असतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले, २५ वर्षांत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईकरांसाठी केलेले काम दाखवा. मुंबईची मेट्रो, कोस्टल रोड करण्यासाठी आम्हाला सत्तेत यावे लागले. धारावीचा प्रकल्प हे करू शकले नाहीत. हे करण्यासाठी भाजप आणि मोदींना सत्तेत यावे लागले. आता उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले की म्हणतील मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, पण कुणाच्या बापाच्या बापालाही ते जमणार नाही.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे बुधवारी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आगमन झाले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांना खडे बोल

 अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, महागड्या गाड्यांमधून फिरणे बंद करा. सत्तेत आहात तर नम्र रहा; दिखाऊपणा करू नका, असे खडे बोल यावेळी सुनावले. सत्ता आली की अनेकांचे तंत्र बिघडते. भाजपचे नेते, कार्यकर्ते त्याला अपवाद असले पाहिजेत.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या अनेक कामांची शिदोरी आपल्याजवळ आहे. सामान्य माणसांना या कामगिरीविषयी साध्या सोप्या भाषेत सांगितले पाहिजे. त्यांच्या वस्त्यांमध्ये तुम्ही जाल तेव्हा सत्तेत असलेली बडेजावू दाखवणारी माणसे आली आहेत असे मुळीच वाटता कामा नये असेही नड्डा यांनी बजावले.

टॅग्स :जगत प्रकाश नड्डाभाजपा