भाजपाचा आज महामेळावा, मुंबईकडे येणारे मार्ग फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:45 AM2018-04-06T04:45:06+5:302018-04-06T04:45:06+5:30

भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी बीकेसी मैदानावर होत असलेल्या महामेळाव्यात गर्दीचे विक्रम मोडण्याची जय्यत तयारी भाजपाने केली आहे. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी सायंकाळी मुंबईत आले असता त्यांचे मुंबई भाजपाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

BJP 38 foundation day | भाजपाचा आज महामेळावा, मुंबईकडे येणारे मार्ग फुलले

भाजपाचा आज महामेळावा, मुंबईकडे येणारे मार्ग फुलले

Next

मुंबई - भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी बीकेसी मैदानावर होत असलेल्या महामेळाव्यात गर्दीचे विक्रम मोडण्याची जय्यत तयारी भाजपाने केली आहे. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुरुवारी सायंकाळी मुंबईत आले असता त्यांचे मुंबई भाजपाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी या वेळी उपस्थित होते.
उद्या सकाळी ११ ला होणाऱ्या महामेळाव्याला अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूृपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी मार्गदर्शन करणार आहेत. महामेळाव्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यातून येणाºया कार्यकर्त्यांच्या गाड्यांनी मुंबईकडे येणाºया सर्वच रस्त्यांवर गर्दी केली आहे. याशिवाय, २८ विशेष रेल्वे गाड्यांनी कार्यकर्ते राज्यभरातून येणार आहेत.
शिवसेनेचा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा, मनसेचा त्याच ठिकाणचा पाडवा मेळावा तसेच यापुढे दरवर्षी भाजपाच्या स्थापना दिनी बीकेसी मैदानावर महामेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचे भाजपाने ठरविले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनालाही हा महामेळावा हे उत्तर असेल. केंद्र, राज्यात सत्ता आल्यानंतर ग्राम पंचायत ते महापालिकांपर्यंतच्या निवडणुकात मोठे यश मिळविल्यानंतर होत असलेला हा भाजपाचा पहिलाच महामेळावा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या असताना कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळावी हा पक्षाचा प्रयत्न आहे. या मेळाव्याला ५ लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा पदाधिकाºयांनी केला आहे.

वाहतूककोंडी होण्याची शक्यता
भाजपाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यभरातून ३४ रेल्वेगाड्यांमधून भाजपाचे कार्यकर्ते येथे दाखल होणार असून, सात हजारांहून अधिक बसमधून कार्यकर्ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाहून येथे येणार आहेत. याशिवाय दहा हजार लहान वाहनांतून कार्यकर्ते बीकेसीत येणार आहेत. परिणामी शुक्रवारी बीकेसीकडे येत असलेल्या सर्व रस्त्यांवर वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या स्वागतासाठी गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे अनेक प्रवाशांची विमाने चुकली.

कोअर कमिटीची बैठक

प्रदेश भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक अमित शहा यांनी रात्री एमसीएला घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, व्ही. सतीश उपस्थित होते.
या बैठकीत आपसात कुठलेही मतभेद न ठेवता निवडणुका समोर ठेवून कामाला लागण्याचे आदेश अमित शहा यांनी दिले. शिवसेनेला सोबत घेण्याची भूमिका असेल पण युती करणे ही भाजपाचीच जबाबदारी असू शकत नाही, असे उद्गार शहा यांनी काढले. याचा अर्थ युतीसाठी भाजपा तडजोड स्वीकारणार नाही, असे संकेत त्यातून मिळाले आहेत.

कार्यक्रमासाठी आम्ही चोख बंदोबस्त ठेवला आहे. गर्दी लक्षात घेता मुंबईकरांनी सकाळी आणि दुपारच्या वेळी शक्यतो या मार्गावरून प्रवास टाळावा, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.
- अनिल कुंभार, पोलीस उपायुक्त, परिमंडळ आठ

Web Title: BJP 38 foundation day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.