मुंबई - राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय लढाई सुरू झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दाखला देत भाजपासोबत फारकत घेतली. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडी बनवली. या महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपला विश्वासघात केला असा आरोप करत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. तर, शिवसेना हाच पहिला विरोधक मानून काम सुरू केलं. त्यामुळे, आता दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
भाजपा शिवसेना वाद सुरू असतानाच आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेतील मोठा गट त्यांच्यासोबत गेला आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजपा असं राजकीय समीकरण झालं आहे. आज शिवसेनेच्या वर्धापन दिननिमित्त प्रथमच दोन्ही गटाच्या नेत्यांनी वर्धापन दिन साजरा केला. यावेळी, उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा गद्दार म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला. तर, बाप चोरणारी टोळी म्हणत यापूर्वीच शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं. आता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात मनोमिलन होणे कठीण असल्याचं म्हटलंय.
महायुतीला २०१९ मध्ये जेव्हा जनाधार मिळाला तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार होते. स्वत: उद्धव ठाकरेंनी १५-१६ सभांमधून मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होणार असल्याचं मान्य केलं होतं. त्यावेळी, सभांच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही होते. पण, निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली, त्यांनी दरवाजे बंद केले.
उद्धव ठाकरेंच्या या कृतीमुळे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वाईट वाटलं. कारण, देवेंद्रजींचं मुख्यमंत्रीपद चोरण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं होतं. पण, मनभेदही निर्माण झाले, वैचारीक लढाईतून ते दूर गेले. वैचारीक लढाईदेखील उद्धव ठाकरेंनी संपवली. मुख्यमंत्री स्वत: आणि मुलगा मंत्री व्हावा यासाठी त्यांनी तडजोड केली. काँग्रेससोबत जावं लागलं तर शिवसेना हे दुकान मी बंद करेल, असं बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरेंनी संपुष्टात आणला. त्यामुळे, केवळ मतभेद नाही, तर आता मनभेदही तयार झाले आहेत. त्यामुळे, आता कधी उद्धव ठाकरे आमच्यासोबत किंवा आम्ही त्यांच्यासोबत एकत्र येऊ, असे वाटत नाही. कारण, आता ते दिवस गेले, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यासंदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडली.