लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्त पदी सनदी अधिकारी नेमला नसल्या प्रकरणी भाजपाच्या कार्यकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन , महापालिका आणि आयुक्त दिलीप ढोले यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे . भाजपाच्या कार्यकर्त्याने शिंदे - फडणवीस व राज्य सरकार विरुद्ध याचिका केल्याने खळबळ उडाली आहे .
मिळालेल्या माहिती नुसार , मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्त पदी सनदी अधिकारी नियुक्त करण्याचे शासन निर्देश असताना सनदी अधिकारी नसलेल्या व जीएसटी विभागाचे असलेले दिलीप ढोले यांची शासनाने आधी अतिरिक्त आयुक्त पदी आणि नंतर आयुक्त पदी नियुक्ती केल्याचा मुद्दा सेल्वराज शणमुगम यांनी जनहित याचिके द्वारे उपस्थित केला आहे . ढोले हि एकनाथ शिंदे मंत्री असताना त्यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते . महाविकास आघाडी सरकार काळात शिंदे नगरविकास मंत्री असताना नगरविकास विभागाने २०२० साली ढोले यांची अतिरिक्त आयुक्त पदी व २०२१ सालात त्यांची आयुक्त पदी नियुक्ती केली .
सनदी अधिकाऱ्याच्या पदावर बिगर सनदी अधिकारी नेमण्यात आला व राज्यात सत्ता बदल झाल्या नंतर सुद्धा हि नियुक्ती कायम का आहे ? असा सवाल याचिकेत केला आहे . शिंदे यांनी राजकीय फायद्यासाठी हि निवड केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयाने दखल घेऊन ढोले यांची केलेली बेकायदा निवड रद्द करण्याची मागणी याचिके द्वारे केली गेली आहे .
याचिकाकर्ते सेल्वराज हे मीरा भाईंदर भागात भाजपाचे कार्यकर्ते आहेत. ते भाजपाचे महापालिकेतील माजी उपमहापौर असलेले हसमुख गेहलोत तसेच माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात . भाजपा कार्यकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा जनहित याचिकेत प्रतिवादी केल्याने खळबळ उडाली आहे . या प्रकरणी सेल्वराज यांच्याशी याचिके बद्दल माहिती साठी संपर्क साधला असता त्यांनी आपण गाडी चालवत आहोत , नंतर माहिती देतो असे उत्तर दिले . नंतर पुन्हा कॉल केला असता त्यांनी उचलला नाही . तर भाजपा कार्यकर्त्यानेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात याचिका केल्याने शिंदे समर्थक व भाजपा सह शहरात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे .