भाजपानं पुन्हा शिवसेनेला डिवचलं, मुंबई शिक्षक मतदारसंघातून अनिल देशमुखांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 03:30 PM2018-06-05T15:30:23+5:302018-06-05T15:30:23+5:30
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाकडून अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये पालघरसारखाच इथेही थेट सामना रंगणार आहे.
मुंबई- शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाकडून प्रा. अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये पालघरसारखाच इथेही थेट सामना रंगणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवाराबाबत मोठा निर्णय घेताना शिवसेनेने काल विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना डावलण्यात आल्यानं त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांकडे राजीनामाही सुपूर्द केला होता.
मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपानं अनिल देशमुखांना थेट उमेदवारी देत एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. एकीकडे शिवसेनेला थेट अंगावर घेत राणेंच्या स्वाभिमान पक्षालाही कात्रजचा घाट दाखवला आहे. त्यामुळे नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष आता स्वतंत्र उमेदवार देतो की भाजपाला पाठिंबा देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुंबई आणि ठाणे पदवीधर मतदारसंघाची यावेळची निवडणूक शिवसेनेसाठी भलतीच प्रतिष्ठेची आहे. ठाण्यात निरंजन डावखरेंना राष्ट्रवादीतून फोडून भाजपाने मोठा डाव टाकल्यानंतर शिवसेनेनं माजी महापौर संजय मोरे यांना रिंगणात उतरवलं आहे.