राज्यात संघविरोधात भाजपा! शिक्षक परिषदेशी काडीमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:06 AM2018-05-09T06:06:37+5:302018-05-09T06:06:37+5:30
आतापर्यंत हातात हात घालून एकत्र लढणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये काडीमोड झाल्याची चर्चा आहे. मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाने संघ परिवारातील शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवार जाहीर केले.
- चेतन ननावरे
मुंबई : आतापर्यंत हातात हात घालून एकत्र लढणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेमध्ये काडीमोड झाल्याची चर्चा आहे. मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाने संघ परिवारातील शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवार जाहीर केले. त्यामुळे नाराज शिक्षक परिषदेने मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली. परिणामी, विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्याच्या भाजपाच्या स्वप्नांवर विरजण पडण्याची चिन्हे आहेत.
याबाबत नुकतीच नागपूर येथे शिक्षक परिषदेच्या पदाधिकाºयांची बैठक झाली असून, त्यात हा निर्णय झाला आहे. मुंबई व नाशिक या दोन मतदारसंघांत जूनमध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. त्यात मुंबईमध्ये अनिल बोरनारे, तर नाशिकमधून सुनील पंडित यांची उमेदवारी शिक्षक परिषदेने २४ मार्च रोजी पुणे येथे घोषित केली. मात्र त्यानंतर भाजपानेही आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
गेल्या ३० वर्षांपासून संघ परिवारातील शिक्षक परिषदेने उमेदवार घोषित करावा व भाजपाने त्यास पाठिंबा द्यावा, हे राजकीय समीकरण राज्यात सुरू आहे. मात्र भाजपाने आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांसह संघ परिवारात धुसफूस सुरू असून, तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आजपर्यंत भाजपाने शिक्षक परिषदेच्याच उमेदवारांना निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. मात्र या वेळी येऊ घातलेल्या निवडणुकीत विद्यमान शिक्षक आमदार कपिल पाटील यांची धास्ती घेऊन भाजपाने खेळलेली ही खेळी आता पक्षाच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण मुंबईतून भाजपाची उमेदवारी मिळविलेल्या अनिल देशमुख यांच्या संघटनेतही भाजपाची उमेदवारी घेतल्याने बहुतेक पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे शिक्षक परिषदेसोबत वैर पत्करून भाजपाने स्वत:च्याच अडचणींत वाढ केल्याची चर्चा आता मतदारसंघात आहे.
मुख्यमंत्री मार्ग काढणार का?
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात मुख्यमंत्री हे शिक्षक परिषद आणि भाजपामधील कटुता दूर करण्याचा प्रयत्न करतील, असे समजते.
कपिल पाटील यांना फायदा होणार?
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतील बहुतांश कार्यकर्ते काँग्रेस व अन्य पक्षांच्या वळचणीतील कार्यकर्ते आहेत. अशा परिस्थितीत केवळ कपिल पाटील यांना पराभूत करण्याच्या दिवास्वप्नामागे भाजपाची उमेदवारी देशमुख यांनी स्वीकारल्याने संघटनेत नाराजी आहे. तर बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने संपूर्ण संघ परिवार नाराज आहे. परिणामी, या फाटाफुटीचा थेट फायदा कपिल पाटील यांना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.