Join us

शिवसेना विरोधात भाजप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:07 AM

मुंबई : महापालिका निवडणुकीला काही महिने उरले असल्याने भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्यास ...

मुंबई : महापालिका निवडणुकीला काही महिने उरले असल्याने भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पालिका महासभा, विशेष बैठका प्रत्यक्ष घेणे, डिजिटल यांचा प्रस्ताव चर्चेविना समितीमध्ये मंजूर करणे याच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी बुधवारी पालिका मुख्यालयात महापौर दालनासमोर निदर्शने केली.

बेस्ट उपक्रमांमध्ये डिजिटल तिकिटांचा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंगळवारी मंजूर करण्यात आला. मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट देऊन शिवसेनेने आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाचे ३५ कोटींचे नुकसान केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या कंत्राटाच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केले.

पालिकेचा कारभार पारदर्शी करा, आभासी नको प्रत्यक्ष बैठका घ्या, अशा घोषणा भाजप नगरसेवकांनी यावेळी दिल्या. पालिकेतील वैधानिक समित्या, महासभा आदींच्या बैठका अद्यापही ऑनलाइन होत आहे. यामुळे पालिकेत भ्रष्टाचार वाढत असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. यापुढे आभासी नको तर प्रत्यक्ष बैठका घ्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पत्रकारांना सभांमध्ये प्रवेश द्या

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर महापालिकेने प्रत्यक्ष विविध सभांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली होती. मात्र या बैठकांमध्ये पत्रकारांना प्रवेश देण्यात येत नव्हता. त्यामुळे आता प्रत्यक्ष सभा घेण्यास सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनाही प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

तीन मिनिटांत १२० कोटींचे प्रस्ताव मंजूर...

बेस्ट उपक्रमाच्या पटलावर मांडण्यात आलेले १२० कोटींचे आठ प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना बेस्ट समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. नियमानुसार प्रत्येक प्रस्तावावर सभेत चर्चा होऊन सर्वानुमते प्रस्ताव मंजूर होणे अपेक्षित असते. मात्र सदस्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, अशी नाराजी भाजपने व्यक्त केली.