Join us

असमान निधी वाटपावरून भाजप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 1:58 AM

जनता दरबारात पोलखोल करण्याचा सत्ताधारी शिवसेनेला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुढच्या वर्षी महापालिका निवडणूक असल्याने आपल्या विभागात आकर्षक कामे करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. मात्र यासाठी मंजूर केलेल्या ६५० कोटींच्या विकास निधीतून शिवसेनेने ५२ टक्के स्वपक्षीयांसाठी राखून दुसरा मोठा पक्ष असलेल्या भाजपची ५९ कोटींवर बोळवण केली आहे. त्यामुळे शिवसेना व विरोधी पक्षातील सर्व नगरसेवकांच्या वाट्याला प्रत्येकी तीन ते चार कोटी तर भाजप नगरसेवकांना प्रत्येकी केवळ एक कोटी ७१ लाख रुपये विकास कामांसाठी मिळणार आहेत.

या असमान निधी वाटपाची जनतेसमोर पोलखोल करणार असल्याचा इशारा भाजपने पत्रकार परिषदेत दिला. परिणामी, शिवसेना - भाजपमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभागातील कामांच्या चौकशीची मागणी भाजप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. तेव्हापासून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढू लागले. याच दरम्यान, सन २०२१-२०२२ चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये नगरसेवक निधी व विभागातील विकास निधीसाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने यात स्वतःसाठी ३४२ कोटींची तर दुसरा मोठा पक्ष असलेल्या भाजपला केवळ १४२ कोटी दिले आहेत. सत्ताधारी शिवसेना विशेषतः स्थायी समिती अध्यक्ष भाजप विरोधात सूडबुद्धीने वागत आहे. त्यामुळेच विकास निधी वाटपात अध्यक्षांनी भेदभाव केला आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांच्या प्रभागातील विविध कामांसाठी वेगळा १८.५० कोटी रुपयांचा निधी घेतल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. तुलनेने कमी संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षांना जास्त निधी मिळाला आहे.