पनवेल:राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवारी टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. १२ महिन्यांचे १२०० युनिटचे वीज बिल माफ करा तसेच शेतकऱ्यांचे किमान पाच वर्षे वीज कनेक्शन कापू नये, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
------------------------------------------
पालघर जिल्ह्यात महावितरण कार्यालयांवर हल्लाबाेल
लाेकमत न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्ह्यात शुक्रवारी भाजपतर्फे महावितरण कार्यालयाला टाळे ठाेकाे आंदाेलन करून हल्लाबाेल करण्यात आला. वाडा, डहाणूमध्ये आंदाेलकांनी महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठाेकले तर तलासरीतील कार्यालयाला टाळे ठाेकण्याच्या तयारीत असलेल्या आंदाेलकांना पाेलिसांनी राेखले.
महावितरणने ७५ लाख वीज ग्राहकांना वीजजाेडणी ताेडण्याची नाेटीस बजावून सर्वसामान्य ग्राहकांना अंधारात ठेवण्याचे पाप राज्य सरकार करत असल्याची टीका यावेळी आंदाेलकांनी केली. यावेळी आंदाेलकांनी राज्य सरकारविराेधात जाेरदार घाेषणा देताना शिवसेनेवरही टीका केली.
----------------------------------
भाजपची इंधन दरवाढी विरोधात चुप्पी
जनतेच्या प्रश्नी शिवसेना, भाजपा रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड - जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने इंथन दरवाढी विराेधात केंद्र सरकारवर आंदाेलन करुन निशाणा साधला आहे, तर भाजपने वीज बिलाबाबत राज्य सरकार विराेधात हल्लाबाेल केला आहे. दाेन्ही प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे असले तरी, भाजपने इंधन दरवाढी विराेधात चुप्पी का साधली आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अलिबाग मुख्यालयाच्या ठिकाणी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढला. पेट्राेल, डिझेल आणि सिलिंडरच्या दराचा भडका उडाल्याने सरकारने तातडीने आकाशाला भिडलेले दर कमी करावेत अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले, तर भाजपाने वीज बिलाबाबत अलिबाग येथील महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबाेल करत टाळे ठाेकाे आंदाेलन केले. महावितरणने ग्राहकांना वीज कनेक्शन कापण्याच्या पाठवलेल्या नाेटिसा रद्द करा अशी प्रमुख मागणी केली. यावेळी महावितरण कार्यालयाजवळ पाेलिसांनी आंदाेलकांना राेखले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड.महेश माेहिते यांनी विविध मागण्यांचे निवेदन महावितरणला दिले.