लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मनसे आणि उद्धवसेनेला मोठा धक्का बसला आहे. विविध कार्यक्रम आणि सभांसाठी शिवाजी पार्कचे मैदान वर्षातून ४५ दिवस आरक्षित असते. मात्र, हा कालावधी संपल्यामुळे या दोन्ही पक्षांना सभेसाठी मैदान मिळणार नाही. त्याचवेळी सर्वांत आधी अर्ज केलेल्या भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेनेला मात्र मैदान मिळाले आहे.
४५ दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे मनसे आणि उद्धवसेनेला मैदान मिळणे कठीण आहे. या दोन्ही पक्षांनी १७ नोव्हेंबरला सभेसाठी मैदान मिळावे म्हणून पालिकेला स्मरणपत्र पाठविले आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांना पाठविला जाणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविला जाईल.
परवानगी का नाकारली? निवडणूक जाहीर झाल्यानंतर १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी मैदान मिळावे यासाठी मनसेने १४ ऑक्टोबरला अर्ज केला. त्यानंतर पुन्हा १५ ऑक्टोबरला अर्ज करण्यात आला. त्याचवेळी उद्धवसेनेनेही अर्ज केला होता. सभा घेण्यासाठी १० नोव्हेंबरला शिंदेसेना, १२ नोव्हेंबरला भाजप, तर १४ नोव्हेंबरला अजित पवार गटाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मैदान वापरण्याचा ४५ दिवसांचा कालावधी संपला आहे. परिणामी, १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी मनसे आणि उद्धवसेनेला परवानगी मिळालेली नाही.