आक्रमक नेतृत्वाअभावी भाजप मुंबई महापालिकेत एकाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 03:39 AM2020-02-22T03:39:55+5:302020-02-22T03:40:28+5:30
नवीन गटनेत्याची प्रतीक्षा; पहारेकऱ्याची भूमिका बजावण्यात असमर्थ
शेफाली परब पंडित
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबई पालिकेतही भाजपची पकड सैल झाल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस येथे विरोधी बाकावर आहे. त्याचवेळी दुसरा मोठा पक्ष असूनही पहारेकºयाची भूमिका बजावण्यात भाजप अलीकडे कमी पडू लागला आहे. मनोज कोटक खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवर भाजप अद्याप आक्रमक नेतृत्वाच्या शोधात आहे.
२०१७ ची निवडणूक स्वबळावर लढविणाºया भाजपने आपला महापौर निवडून आणण्याचा निर्धार केला. मात्र राज्यातील सत्तेसाठी महापौरपदाच्या स्वप्नावर त्यांना पाणी सोडावे लागले. पालिकेत दुसरा मोठा पक्ष असूनही भाजपने विरोध बाकावर बसत पहारेकºयाची भूमिका स्वीकारली. पहिल्या वर्षी भाजप सदस्यांनी सत्ताधारी शिवसेनेची कोंडी केली. राज्यात सत्तेचे गणित बदलल्यानंतर भाजप पालिकेत विरोधी बाकावर बसण्याच्या तयारीत होते.
मात्र भाजपचे विद्यमान गटनेते लोकसभा निवडणुकीत खासदारपदी निवडून आल्यानंतर महापालिकेत फिरकलेले नाहीत. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असल्याने पालिकेच्या कामकाजात भाग घेणे त्यांना शक्य नाही. त्यांच्या गैरहजेरीत गेल्या आठ महिन्यांत नवीन गटनेत्यांची नियुक्ती भाजपने केली नाही. त्यांचे काही नगरसेवक चांगले वक्ता आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांत त्यांची आक्रमकता दिसून आलेली नाही.
भूमिका मांडताना प्रयत्न ठरले निष्फळ
महापालिकेत शिवसेनेचे ९६ नगरसेवक आहेत. त्याच वेळी भाजपकडे ८२ एवढे संख्याबळ आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी - समाजवादी असे तिन्ही पक्ष राज्यात शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसेनेला महापालिकेत कोणी विरोधक उरलेले नाही, असे चित्र दिसून येत आहे. याचा पुरेपूर फायदा सत्ताधारी पक्ष उठवत आहे. स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे आपली भूमिका मांडताना दिसतात. मात्र नेतृत्व नसल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
प्रस्ताव पाठविला परत : स्थायी समितीमध्ये सत्ताधारी शिवसेना महापालिकेतील विरोधी पक्ष भाजपला कोंडीत पकडत असल्याचे दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे, भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या मागणीनुसार वांद्रे येथील किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मात्र स्थानिक नगरसेवक काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी तांत्रिक अडचणी निदर्शनास आणल्यानंतर हा प्रस्ताव आता परत पाठविला. देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचºयातून वीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर आता भाजपने विरोध सुरू केला आहे.