'मविआ'च्या मोर्चाला भाजपाही उत्तर देणार, 'माफी मांगो' आंदोलन करणार; खासदार, आमदार रस्त्यावर उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:25 PM2022-12-16T12:25:29+5:302022-12-16T12:29:52+5:30
महापुरुषांच्या अपमानाचा निषेध करत महाविकास आघाडीनं मुंबईत उद्या महामोर्चाचं आयोजन केलेलं असताना आता भाजपाही रस्त्यावर उतरणार आहे.
मुंबई
महापुरुषांच्या अपमानाचा निषेध करत महाविकास आघाडीनं मुंबईत उद्या महामोर्चाचं आयोजन केलेलं असताना आता भाजपाही रस्त्यावर उतरणार आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी 'माफी मांगो' आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलेत होते.
"मविआकडून आयोजित केलेल्या मोर्चाला भाजपाही रस्त्यावर उतरुन उत्तर देणार आहे. महापुरुषांच्या अपमानावर बोलणारे उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांच्या अपमानाबाबत गप्प का आहेत? तसंच संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा चुकीचा उल्लेख केला. त्याबाबत काही बोलणार आहात का? आता आम्हीही 'मविआ'ला रस्त्यावर उतरुनच उत्तर देऊ. उद्या मुंबई भाजपाकडून ठिकठिकाणी 'माफी मांगो' आंदोलन केलं जाईल. मविआच्या मोर्चाला काळे झेंडे दाखवले जातील. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार यात सहभाही होतील", असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
संजय राऊतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तकं देणार
संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचा उल्लेख केला. त्यामुळे आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की आंबेडकरांचा जन्म नेमका कुठं झाला आहे. याचा अभ्यास त्यांना व्हावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तकं राऊतांना भेट म्हणून पाठवणार आहे, असं आशिष शेलार म्हणाले.