मुंबई : नियमांची चौकट व राजकीय पक्षांच्या वादामुळे काही दिवसांपासून गोविंदा उत्सवाचा विषय गाजत आहे. यामध्ये आता मुंबई भाजपानेही उडी घेतली असून, दहीहंडीसाठी लागू केलेल्या नियमांत ३० आॅगस्ट रोजी वांद्रे रिक्लमेशन येथे मानवी मनोरे उभारून उत्सव साजरा करण्याचा इरादा भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केला. त्यामुळे राजकीय लोण्यासाठी भाजपाही सरसावल्याची चर्चा मंडळांमध्ये आहे. २० फुटांहून अधिक उंच हंडी बांधू नये, १२ ते १५वर्षीय गोविंदांना उत्सवात सहभागी व्हायचे असल्यास पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र आणावे, यासह काही अटी मंडळांवर घातल्या आहेत. त्यामुळे उत्सवावर निर्बंध घालून उत्सव संपवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याला प्रत्युत्तर देताना, शेलार यांनी नियमांत उत्सव कसा साजरा होतो, हे पाहण्यासाठी संजय निरुपम, सचिन अहिर व जितेंद्र आव्हाड यांना ३० आॅगस्टचे आमंत्रण दिले आहे. विरोधी पक्ष आता उत्सवांवर बोलत आहेत. पण, प्रत्यक्षात त्यांनी काहीच केलेले नाही. नियम घालण्यात आले, या वेळी त्यांनी पालिकेला संपर्क साधला नाही. आयुक्तांना कोणतेही निवेदन दिले नाही. हरकती मांडल्या नाहीत. न्यायालयाचा निर्णय आल्यावरही कोणीही न्यायालयात गेले नाही. जनहित याचिका टाकली नाही. आता संभ्रम असल्याचे त्यांचे म्हणणे योग्य नाही. पहिल्यापासून भाजपाने भूमिका मांडली आहे. नियमांत उत्सव साजरे होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
हंडीतील ‘लोण्या’साठी भाजपाही उत्सुक
By admin | Published: August 18, 2015 3:19 AM