मुंबई: मुंबई महानगरपालिकेची मुदत उलटून गेली असून, पालिकेवर आताच्या घडीला प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेसह अन्य पालिकांच्या निवडणुका आगामी काळात कधीही लागू शकतात. त्यामुळे सर्व पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईत भाजपने एकीकडे पोलखोल आंदोलन सुरू असताना दुसरीकडे भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी महापालिकेवर एक मोठा आरोप केला आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कपडे धुण्यासाठी टनेल लाँड्री खरेदी करण्यासाठी पालिकेने तब्बल १६० कोटी रुपयांची निविदा काढली असून, यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी १६ कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला आहे.
अमित साटम यांनी महापालिका आयुक्त चहल यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात साटम यांनी नमूद केले आहे की, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी आपण अत्याधुनिक टनेल लाँड्री बनवण्याचा १६० कोटी रुपयांचा कंत्राट काढला आहे. पण ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी? असा सवाल केला आहे.
पालिका अधिकाऱ्याने १६ कोटीची रक्कम स्वीकारली
अमित साटम यांनी दावा केला की, त्यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार हे कंत्राट काढण्यासाठी महापालिकेतील एका अधिकाऱ्याने १६ कोटीची रक्कम स्वीकारली आहे. त्याचे सविस्तर पुरावे मी वेळ आल्यावर तपास यंत्रणेला सादर करील, असे साटम यांनी म्हटले आहे. एकूणच १६० कोटी रुपयांच्या टनेल लाँड्रीचा अभ्यास केल्यास त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे आयुक्तांच्या लक्षात येईल. या निविदेत कुठलेही तंत्रज्ञान, टेक्निकल स्पेसिफिकेशन किंवा अनुभव याबाबत यात कुठलीही एकसुत्रता नाहीये आणि सगळ्या गोष्टी विशिष्ट कंत्राटदाराला फायदा होईल याच हिशोबाने ‘ट्विक’ केल्या आहेत, असा आरोप साटम यांनी केला आहे.
मार्गदर्शक तत्वे धाब्यावर बसवली
जेव्हा निविदा निघते तेव्हा महापालिका आणि केंद्रीय दक्षता समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार संबधित कंपनीच्या कामांचाच अनुभव ग्राह्य धरला जातो. परंतु, ही मार्गदर्शक तत्वे धाब्यावर बसवून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या व विदेशातील कंपन्यांचाही मार्ग सुकर करण्यात आला आहे. टक्केवारीने डोळे झाकले असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना याचेही भान राहिले नाही की ज्या रुग्णालयाच्या आवारात ही टनेल लाँड्री उभारण्याचे प्रस्तावित आहे, ते क्षयरोगाचे रुग्णालय आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जर क्षयरोग रुग्णालयात टनेल लाँड्री बनवून तिथे धुवून व सुकवून पाठवले तरी त्याद्वारे जंतूसंसर्ग होणार नाही याची हमी आरोग्य विभाग देणार आहे का? आणि या भितीपोटीच आरोग्य विभागाने ही परवानगी दिली नसल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. जर आरोग्य विभागाला ही भीती वाटत असेल तर त्याठिकाणी टनेल लाँड्री उभारण्याचा हट्ट धरुन भविष्यात रुग्णालयातील विविध आजारांनी ग्रासलेले रुग्ण आणि डॉक्टर यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का केला जात आहे? अशी विचारणा साटम यांनी केली आहे.
दरम्यान, आपणास प्रशासक म्हणून ही सूचना करू इच्छितो की, त्वरीत निविदा प्रक्रीया रद्द करावी व संबंधित अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आपणही त्यांच्याच हेतूला पुरस्कृत करित आहात अशी धारणा जनसामान्यांमध्ये प्रस्थापित होईल, असे साटम यांनी म्हटले आहे.