मुंबई - भाजप व काँग्रेस यांच्यात तसे विळ्या-भोपळ्याचेच नाते आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर राजकीय टीका करताना संधी सोडत नाहीत, असे राज्यातले चित्र आहे. मात्र आज मालाड पश्चिम, मार्वे रोड, खारोडी येथे पी उत्तर विभागात मुंबई महानगर पालिकेतर्फे आयोजित स्वच्छता अभियानात भाजप व काँग्रेस एकत्र आले आणि त्यांनी "माझी मुंबई स्वच्छ मुंबई" सहभाग घेतला आणि येथील प्रसिद्ध पुरातन लोटस तलाव स्वच्छ करत त्याला गतवैभव देण्याचा मनापासून प्रयत्न केला.
उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार "माझी मुंबई स्वच्छ मुंबई" हा उपक्रम मुंबई महानगर पालिकेतर्फे १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान माझी मुंबई - स्वच्छ मुंबई हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पी/उत्तर विभागात गावदेवी लोटस तलाव, राठोडी, मार्वे रोड या ठिकाणी आज सकाळी 11:30 वाजता उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी व मालाड पश्चिम विधानसभेचे स्थानिक आमदार अस्लम शेख तसेच सहाय्यक पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त आयुक्त किरण दिघावकर व माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
पी/उत्तर विभागात अस्तित्वात असलेल्या 18 तलावांपैकी 11 तलाव राज्य शासन, 2 तलाव महाडा, 2 तलाव जिल्हाधिकारी व 3 तलाव महापालिका यांच्या अखत्यारित येतात. आज या अभियानाच्या पहिल्या दिवशी लोटस तलाव स्वच्छ करण्याकरिता मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशी, मनपा कर्मचारी, सामाजिक व शैक्षणिक संस्था यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच उपस्थिताना खासदार गोपाळ शेट्टी व आमदार अस्लम शेख यांनी स्वच्छते करिता संबोधित केले. त्यानंतर तर या दोघांनी हातात लांब पंजा बांबू हाती घेत येथील साचलेले शेवाळे व वनस्पती काढण्याचा आणि लोटस तलाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते सह सुमारे 500 विद्यार्थी,नागरिक देखिल उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाकरिता मुंबई पब्लिक स्कूल मालवणी टाऊनशिप व मालवणी व्हिलेज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच मायग्रेन सोसायटी, वंदे मातरम शिक्षण संस्था व विविध स्थानिक संस्थांनी सहभाग नोंदवला. सदर स्वच्छता कार्यक्रमाकरिता तराफ, जेसीबी व क्रेन या यंत्रांचा वापर करून स्वच्छता करण्यास सुरुवात केली. तसेच पी/उत्तर विभागात हिरादेवी तलाव भाटीगाव व शांताराम तलाव या तलावांची देखील साफसफाई करण्यात येणार आहे. अशाप्रकारे पी/उत्तर विभागातील सर्व 18 तलावांची स्वच्छता करण्यात येणार आहे.