"भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही चौकशीसाठी तयार"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 12:59 AM2020-10-07T00:59:17+5:302020-10-07T00:59:43+5:30
अतुल भातखळकरांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांना टोला
मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणात शवविच्छेदन अहवाल अद्याप अधिकृत झालेला नसतानासुद्धा गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर आरोप करणे हे हास्यास्पद आहे़ आपल्या निष्क्रिय कारभारामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी नावाच्या सर्कशीतला ‘जोकर’ होण्याचा प्रयत्न अनिल देशमुख यांनी करू नये, असा मिश्किल टोला आमदार अतुल भातखळकर यांनी लावला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याची बदनामी करण्याचे काम भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा खोटा आरोप केला, त्यावर तीव्र निषेध व्यक्त करताना आमदार भातखळकर म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्यात असलेल्या सर्व क्षमता वापरून वाटेल ती चौकशी करावी, भारतीय जनता पक्ष कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी सदैव तयार असून, केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी चौकशीच्या धमक्या देण्याची सवयच अनिल देशमुख यांना आहे़.
‘फोन टॅपिंग’प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे त्यांनी विधानसभेच्या सभागृहात सांगितले होते, त्या चौकशीचे काय झाले हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे असे आव्हानसुद्धा भातखळकर यांनी दिले आहे. तसेच, एकीकडे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात की, राज्यातील आयपीएस अधिकारी महाविकास आघाडी सरकार पाडणार होते, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री हे पोलीस अधिकारी भांडी घासायला ठेवण्याच्या लायकीचे असल्याचे वक्तव्य
करतात.
तसेच एल्गार परिषद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचिट दिलेल्या पुणे पोलिसांची पुन्हा चौकशी करण्याची भाषा करायची, त्यामुळे यातून या सरकारची पोलिसांबद्दलची भावना स्पष्ट होते, त्यामुळे ठाकरे सरकारने पोलिसांच्या बदनामीची काळजी करण्यापेक्षा पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचे काम बंद करावे, नाहीतर महिलांवरील अत्याचार, बलात्कार, दिवसाढवळ्या होणाºया हत्या आणि गंभीर गुन्हे यात महाराष्ट्र देशात क्रमांक एक होण्यास वेळ लागणार नाही हे गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावे, असा खोचक सल्लासुद्धा भातखळकर यांनी
दिला.
‘वाटेल ती चौकशी करा’
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याची बदनामी करण्याचे काम भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा खोटा आरोप केला, त्यावर तीव्र निषेध व्यक्त करताना आमदार भातखळकर म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्यात असलेल्या सर्व क्षमता वापरून वाटेल ती चौकशी करावी़