भाजपच्या जन्माअगोदर मुंबईत शिवसेनेचा नगरसेवक, राऊतांनी सांगितला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 12:06 PM2022-01-25T12:06:38+5:302022-01-25T13:37:21+5:30

भाजप हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा करतानाच अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्न मोदींनी नाही तर न्यायालयाने सोडविला.

BJP and Shiv Sena are full of allegations with devendra fadanvis and sanjay raut | भाजपच्या जन्माअगोदर मुंबईत शिवसेनेचा नगरसेवक, राऊतांनी सांगितला इतिहास

भाजपच्या जन्माअगोदर मुंबईत शिवसेनेचा नगरसेवक, राऊतांनी सांगितला इतिहास

Next

मुंबई : कडाक्याच्या थंडीमुळे यंदा महाराष्ट्र गारठला आहे. अनेक शहरांचे तापमान घसरले पण राजकारणाचा पारा मात्र कमालीचा वाढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हल्लाबोल व त्यावर शिवसेना खा. संजय राऊत यांनी केलेल्या प्रतिहल्ल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. हा कलगीतुरा रंगला असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेल्या कथित विधानांवरून देवेंद्र फडणवीस यांनी, पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीका केली. भाजपच्या नेत्यांनाच मानसोपचाराची गरज असल्याचा टोला पटोले यांनी हाणला.

भाजप हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा करतानाच अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्न मोदींनी नाही तर न्यायालयाने सोडविला. त्यामुळेच मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केले, अशा शब्दांत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना भाजपवर चौफेर टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तसेच सुरुवातीला शिवसेना नेत्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविल्याची आठवण करून दिली. यावर राऊत म्हणाले की, जनता पक्षाच्या पतनानंतर १९८० च्या दशकात भाजपचा जन्म झाला, तर शिवसेनेचा जन्म १९६९ चा आहे. देवेंद्र फडणवीस यांचा तेव्हा मुंबईशी, महाराष्ट्राच्या राजकारणाशी फारसा संबंध नसेल, कारण त्यांच्या जन्माच्या अगोदरच्या या गोष्टी आहेत. त्यामुळे या सर्व संदर्भातील एखादे अभ्यास शिबिर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत ठेवू. जर कोणाला त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना येऊ द्या, असा टोला राऊत यांनी लगावला.

अयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचे योगदान ऐतिहासिक
nअयोध्येच्या लढ्यातील शिवसेनेचे योगदान ऐतिहासिक कार्य आहे. जेव्हा रामजन्मभूमीचा हा लढा थंड पडला होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याने वातावरण परत एकदा जागृत केले आणि सरकारला जाग आणली. त्यामुळे अयोध्येशी आमचा काय संबंध आहे, हे रामाला माहिती आहे. 
nजेव्हा अयोध्येचे आंदोलन झाले तेव्हा कोणताही राजकीय पक्ष नव्हता. आमचे अनेक प्रमुख लोक तेव्हा इथून गेले होते. त्याचे संपूर्ण नियोजन मुंबईतून होत होते. आज कोणी काही म्हणत असले तरी इतिहास आहे. दस्तावेज, रेकॉर्ड्स आहेत. विशेष न्यायालयासमोरील साक्षी-पुरावे आहेत. लालकृष्ण अडवाणींसोबत बाळासाहेब ठाकरे हे त्यातले आरोपी आहेत. मग ते न्यायालय मूर्ख होते का, असा प्रश्नही राऊत यांनी केला.

नेते तर बाळासाहेबच होते, त्यांनी युती सडवली का? : फडणवीस
भाजप-शिवसेना युतीचे नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे २०१२ पर्यंत करतच होते. मग त्यांनी शिवसेनेला सडत ठेवलं का? भाजपसोबत असताना शिवसेना क्रमांक एकवर होती. आज चौथ्या क्रमांकावर गेली. मग ती नेमकी सडली कोणासोबत, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला

बाळासाहेबांवर एक ट्विट तरी करवून दाखवा ना! 
आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीसमोर आजही नतमस्तक होतो; पण आपण ज्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहात त्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधींना बाळासाहेबांच्या सन्मानार्थ एक ट्विट तरी करायला आपण सांगू शकता का, असा प्रश्न फडणवीस यांनी केला.

Web Title: BJP and Shiv Sena are full of allegations with devendra fadanvis and sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.