Join us

अनेक वर्षांची मैत्री दुष्मनीमध्ये बदलली; पुन्हा भाजपा अन् शिवसेनेला एकत्र यावं लागेल- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 9:03 PM

के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईत निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत विविध विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांना भेटून आनंद झाला. उद्धव ठाकरे आणि आमचं अनेक विषयावर एकमत असल्याची माहिती के. चंद्रशेखर राव यांनी यावेळी दिली. तसेच परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचं एक मत असल्याचं देखील के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.

आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे, असं के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं.

के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. के. चंद्रशेखर राव यांना सर्वांना भेटण्याचा आधिकर आहे. त्यांना जी भूमिका मांडायची आहे ती मांडू द्या. ममता बॅनर्जी भेटल्या, त्यामुळे चंद्रशेखर राव उलट सुलट बोलत आहेत. त्यांचं काम तेलंगणापर्यंत मर्यादित आहे. तसेच तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं मत देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे रामदास आठवले यांनी यावेळी होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये एनडीएला यश मिळेल असेही सांगितले. पंजाबमध्ये भाजपला 117 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.  

कोणाचा बाप काढायची गरज नाही- रामदास आठवले

कोणीही शिवीगाळीची भाषा वापरू नये. जे सत्तेत आहेत त्यांनी उलट सुलट बोलू नये. कोणाचा बाप काढायची गरज नाही. मी नक्की प्रयत्न करेल की वाद मिटला पाहिजे. भाजपाशिवसेना एकत्र यावच लागेल. उद्धव ठाकरे यांना सांगणार हा वाद मिटला पाहिजे. अनेक वर्षांची मैत्री दुष्मानीमध्ये बदलली आहे. परत मैत्री व्हायला हवी. राजकारणात काहीही होऊ शकतं, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :रामदास आठवलेशिवसेनाभाजपामहाराष्ट्र सरकार