मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु झाली असून भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपाने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली असून बहुतांश विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट दिलेलं आहे. तर 11 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत आयारामांना प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघाचं पहिल्या यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र खडसेंनी आज विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरल्याने त्यांचे तिकीट कापणार की दुसऱ्या यादीत त्यांना स्थान दिलं जाणार अशी चर्चा सुरु रंगू लागली आहे. भाजपाकडून पहिल्या यादीत पक्षांतर करुन आलेल्या आयारामांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, वैभव पिचड, राणा जगजितसिंह, शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं १२५ जणांची पहिली यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. मात्र या यादीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील काही आजी-माजी मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही.