विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 08:02 AM2021-11-20T08:02:58+5:302021-11-20T08:03:33+5:30
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे गिरीश व्यास निवडून आले होते. त्यांच्याऐवजी आता भाजपने ओबीसी नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. भाजपने कोल्हापूरमधून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या ठिकाणाहून काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अमरीश पटेल काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी नंतर आमदारकीचा राजीनामा दिला व भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ते पुन्हा निवडून आले. भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यामुळे ती जागा आता भाजपकडे जरी असली तरी काँग्रेसने तेथे उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. काँग्रेसकडून अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे गिरीश व्यास निवडून आले होते. त्यांच्याऐवजी आता भाजपने ओबीसी नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेसने भाजपचे छोटू भोयर यांना संधी देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत; कारण या मतदारसंघासाठी काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाहीत. अकोला - वाशिममधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया विद्यमान आमदार आहेत. त्यांनाच शिवसेना पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
मुंबईमधून दोन उमेदवार निवडून आले होते. त्यात काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम यांचा समावेश होता. मात्र, आता रामदास कदम यांना संधी न देता त्या जागी सुनील शिंदे यांचे नाव शिवसेनेने नक्की केल्याचे बोलले जाते. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेस येथून उमेदवारी देण्याच्या विचारात नाही, असे सांगण्यात येते.
त्यामुळे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांची अडचण झाली आहे. दुसरा उमेदवार निवडून आणण्याएवढे संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाही. त्यामुळे दुसरा उमेदवार द्यायचा की नाही या विचारात महाविकास आघाडीचे नेते आहेत. परिणामी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राजहंस सिंह यांना निवडून येण्याची पुरेपूर संधी आहे.