भाजपा-सेना तरली आयारामांच्या जिवावर
By admin | Published: February 25, 2017 03:36 AM2017-02-25T03:36:08+5:302017-02-25T03:36:08+5:30
एन’ वॉर्डमध्ये जरी मराठी आणि गुजराती समाज बहुसंख्य असला तरी येथील लढत चौरंगी ठरली. अंतर्गत वादामुळे सेना व भाजपाला येथे हवे तसे यश मिळाले नाही.
मुंबई : ‘एन’ वॉर्डमध्ये जरी मराठी आणि गुजराती समाज बहुसंख्य असला तरी येथील लढत चौरंगी ठरली. अंतर्गत वादामुळे सेना व भाजपाला येथे हवे तसे यश मिळाले नाही.
पण हे दोन्ही पक्ष आयारामांच्या जिवावर तरल्याचे चित्र या वॉर्डात दिसून आले आहे. तर काँग्रेसला
त्यांची वार्डातील एकुलती एक
जागाही राखण्यात यश आले नाही. भाजपाच्या अब्जाधीश पराग शाह यांच्याकडून विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांना पराभवाची चव चाखावी लागली.
घाटकोपर पूर्व व पश्चिममध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा, असे चित्र रंगणार, याची पक्षश्रेष्ठींना चांगलीच कल्पना होती. त्यामुळे २०१२ मध्ये निवडणूक जिंकलेल्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपा व सेनेत चढाओढ लागली होती. त्यांची ही क्लृप्ती काहीशी कामी आली असली तरी हे दोन्ही पक्ष जेमतेम काठावर पास झाले आहेत. अंतर्गत वादामुळे व बंडखोरीमुळे अनेक मते फुटलीही गेली. कारण संबंधित उमेदवारांनी अपक्ष म्हणून सेनेची मते फोडली. तर भाजपालाही अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागला. त्याचाच परिणाम म्हणून या दोन्ही पक्षांना तीन जागांवर समाधान मानावे लागले.
२०१२ च्या निवडणुकीत युती असताना सेनेला केवळ एकच जागा मिळाली होती, तर भाजपालाही दोनच जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले, मात्र तेही आयारामांच्या जिवावरच. सेनेने गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेले दीपक हांडे यांना सेनेत प्रवेश दिला. यंदाच्या निवडणुकीत १२८ प्रभागातून त्यांच्या पत्नी अश्विनी हांडे निवडून आल्या आहेत. हीच स्थिती १२५ प्रभागाची आहे. यापूर्वी मनसेतून निवडून आलेले सुरेश आवळेंच्या पत्नी रुपाली आवळे सेनेतून निवडून आल्या आहेत. तर २०१२ मध्ये निवडून आलेल्या भारती बावदाने यांना लोकांनी नाकारले. तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केलेल्या सुधीर बावदाने यांच्या भावजय स्नेहल मोरे अपक्ष उभ्या राहून बावदाने यांना कांटे की टक्कर देत आघाडी घेतली. हा सेनेसाठी मोठा धक्का आहे.
तीच स्थिती भाजपाची आहे.
मूळ कार्यकर्त्यांना बाजूला करत मनसेच्या उमेदवारांचा भरणा करत भाजपाला तीन जागा मिळवणे शक्य झाले. असे असले तरी भाजपाला प्रभाग १३२ मध्ये लॉटरीच लागली. संपत्तीमुळे चर्चेत राहिलेल्या
पराग शाह यांना बाजूने कौल
देत नागरिकांनी अनेक वर्षे नगरसेवकपद अबाधित राखणाऱ्या प्रवीण छेडा यांना नाकारले. भाजपासाठी हा अनपेक्षित सुखद धक्का होता, तर काँग्रेसने कधी न कल्पना केलेली घटना. छेडा पराभूत झाल्याने घाटकोपरमध्ये औषधालाही काँग्रेस राहिली नाही. मात्र रितू तावडे यांचा पराभवही भाजपासाठी तितकाच अनपेक्षित आहे.
राष्ट्रवादीला उमेदवारांच्या पुण्याईमुळे जेमतेम तग धरणे शक्य झाले. राखी जाधव खुल्या प्रभागातून निवडणूक लढल्या. मात्र विकासकामांमुळे त्या मतदारांची मर्जी राखू शकल्या. त्याशिवाय हारुन खान यांनाही आपला प्रभाग राखता आला. त्यांचा प्रभाग राखीव असल्याने त्यांनी त्यांच्या पत्नी ज्योती खान यांना निवडणुकीत उभे केले आणि मतदारांनी त्यांचा स्वीकार केला.
मनसेचे दोन्ही उमेदवार पक्षाच्या जोरावर निवडून न येता स्वत:च्या जोरावर निवडून आले. प्रभाग क्रमांक १२६ मधून संजय भालेराव यांच्या पत्नी अर्चना भालेराव व १३३ मधून परमेश्वर कदम यांना मतदारांनी पसंती दिली. (प्रतिनिधी)