MNS Raj Thackeray Ashish Shelar Meeting ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आपल्या चौथ्या साथीदाऱ्याच्या शोधात असल्याचं दिसत आहे. कारण मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली असून दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आशिष शेलार हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटल्याचे समजते.
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर विरोधकांची महाविकास आघाडी कमकुवत झाल्याचं मानलं जात असलं तरीही भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत कोणतीही जोखीम स्वीकारण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळेच मुंबईसह महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांमध्ये प्रभाव असणाऱ्या मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे महायुतीसोबत आल्यास मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर मराठी मते आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीला फायदा होऊ शकतो. तसंच राज यांच्या प्रभावशाली भाषणांचा महायुतीला निवडणुकीदरम्यान वातावरणनिर्मिती करण्यासाठीही फायदा होईल.
दरम्यान, आजच्या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून अद्याप अधिकृतरित्या माहिती देण्यात आली नसून राज ठाकरे यांच्याकडून आज पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्यात भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीत फडणवीस यांनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर भाष्य केलं होतं. राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. या महायुतीत मनसे कुठे असेल? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की "आता मनसे कुठे असेल हे तर आपल्याला वेळ सांगेल. आमची राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा देखील मारतो. काही चांगल्या सूचना ते अनेकवेळा करतात. तर कधी आमच्यावर टीका देखील करतात. सोबत काम करू की नाही हे आता लवकरच आपल्याला समजेल. अजून असा काही निर्णय घेतलेला नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.