Join us

जे औवेसीला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी केले; आशिष शेलारांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 9:51 PM

तुम्हाला मतांसाठी मराठी मुस्लीम चालतात पण हिंदू चालत नाही. तुम्हाला मराठी मुस्लीम वेगळी चूल का मांडावी लागली? असा सवाल शेलारांनी केला.

मुंबई - अडीच वर्षाचा कारभार बघा, तुम्ही मुख्यमंत्री असताना जे काही झाले ते राज्याने पाहिले. अडीच वर्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना लालबागचा राजाही १ वर्ष बसला नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा खंडीत झाली. उंची कमी ठेवा, गर्दी करू नका असं सांगितले असते तर समजू शकलो. जे औवेसीला जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी केले असा घणाघात भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला. बोरीवली येथे जागर विचारांचा हा कार्यक्रम घेण्यात आला त्याठिकाणी ते बोलत होते. 

आशिष शेलार म्हणाले की, कोरोनामध्ये आपला जीव सुरक्षित राहील यासाठी लढाई सुरू होती. रेमडेसिवीर, बेड्स, भाजीपाला लोकांना पोहचतोय का हे भाजपा पदाधिकारी पाहत होते. पण त्याच अडीच वर्षात याकूब मेमनचं थगडे सुशोभिकरण करण्यात आले. तुमचा डाव रडीचा आहे. दाऊदच्या बहिणीसोबत व्यवहार करणारा नवाब मलिक मंत्रिमंडळात बसतो. तुमच्यात हिंमत नव्हती नवाब मलिक राजीनामा द्या सांगायला. नवाब मलिकांचा राजीनामा मागितला तर उद्धव ठाकरेंना राग येत होता असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत तुम्हाला मतांसाठी मराठी मुस्लीम चालतात पण हिंदू चालत नाही. तुम्हाला मराठी मुस्लीम वेगळी चूल का मांडावी लागली? केवळ राजकीय स्वार्थासाठी मुस्लिमांचे लांगुनचालन करण्यासाठी उद्धव ठाकरे हा प्रयत्न करतायेत. मत मागायची तर कामावर मागा. मी उद्याने, हॉस्पिटल बनवले, मी रस्ते बनवले, शाळा दुरुस्त केल्या या कामांवर मते मागा. पण त्यातले केलेले काही नाही. मुंबई महापालिका निवडणुकीतला विजय शिवसेनेकडून सरकतोय. मग धर्म आणि भाषेवर मते मागितली जातायेत असा आरोप भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर केला. 

त्याच काळात उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागत होते तुम्ही वंशज कसे ते सांगा. मतांसाठी कुणासमोरही झुकण्याची त्यांची तयारी आहे. हिंदू आणि मराठी माणसांवर कब्जा मिळवावा हे औरंगजेबाचं स्वप्न होते पण ते पूर्ण झाले नाही कारण तुमचा माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज होते असं सांगत विचारांचा जागरमधून मुंबईला सुरक्षित करायचं आहे. जागर मुंबईचा ही सर्वसामान्यांची चळवळ आहे. आजचा दिवस स्व. बाळासाहेबांना अभिवादन करणारा स्मृतीदिन आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही. मुस्लीम मतांचे लांगुनचालुन करण्यासाठी उद्धव ठाकरे ही कारवाई करत नाही असा आरोप आशिष शेलारांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरे