“उद्धवजी... मणिपूरचं जाऊ द्या, तुम्ही मुंबईतील मालवणीत गेला होता का?”; भाजपचा रोकडा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:42 PM2023-06-19T14:42:32+5:302023-06-19T14:43:44+5:30
Uddhav Thackeray Vs BJP: तुम्हाला मुंबईच्या मालवणीत जायला जमत नाही, तुम्ही पंतप्रधान मोदींना सल्ला देऊ नका, असा पलटवार भाजपने केला आहे.
Uddhav Thackeray Vs BJP: राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून साजरा केला जात आहे. तत्पूर्वी, वरळीतील एका शिबिराला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. या टीकेचा समाचार भाजप नेत्यांकडून घेतला जात आहे. उद्धव ठाकरे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देत आहेत. अमेरिकेला काय जाता मणिपूरला जा... मी तुम्हाला विचारतो मणिपूर सोडा तुम्ही आधी मुंबईच्या मालवणीतला गेलात होतात काय, अशी विचारणा भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला.
स्वतः घरातून बाहेर पडायचे नाही, पडला तर थेट विमानातून लंडनला जायचे. तिथून मुंबईकरांची चिंता करायची म्हणजे काय? तर काहीच करायचे नाही. आणि मोदीजींना सल्ला द्यायला निघाले, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी पलटवार केला. भाजप महिला मोर्चाच्या दादर येथे आयोजित सहकार संस्था प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिले.
मालवणीमध्ये वळवळ करणारी हिरवी चळवळ पण भाजप शांत करेल
तुम्हाला मुंबईच्या मालवणीत जायला जमत नाही. त्यामुळे तुम्ही पंतप्रधान मोदींना सल्ला देऊ नका. भाजप मणिपूर तर शांत करून दाखवेलच. याशिवाय, मालवणीमध्ये वळवळ करणारी हिरवी चळवळ पण भारतीय जनता पार्टीच शांत करेल, उद्धवजी तुमच्या गटात तो दम नाही, असा जोरदार टोला शेलार यांनी लगावला. तर, सहकाराचे काम करताना एकमेकांच्या सहकारणी बना पण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून सांगतो विरोधकांनी विपर्यास प्रचार केला तर रणरागिनी पण बना. अशावेळी तुम्हाला रणरागिणी बनावेच लागेल कारण खोटे बोलणाऱ्यांच पीक वाढले आहे, असे आशिष शेलार म्हणाले.
दरम्यान, काळे म्हटले की सफेद का नाही असे विचारायचे, सफेद म्हटले की पिवळे का नाही, असे विचारायचे. तर पिवळा म्हटले तर लाल का नाही? असे विचारायचे हे उद्योग सुरु आहेत. म्हणून आजूबाजूला विरोधकांचा जो खोटा प्रचार सुरु आहे त्याकडे ही लक्ष द्यावे लागेल, असे आवाहन शेलार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या नऊ वर्षात महिलांसाठी संवेदनशील कसे काम करते आहे याचा सविस्तर उहापोह शेलार यांनी आपल्या भाषणात केला.