BJP Vs Thackeray Group: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट संतुष्ट नसल्याचे दिसत आहे. दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतली असून, ठाकरे गटाने जनता न्यायालय भरवत महापत्रकार परिषद घेतली. या निकालावर टीका करताना काही व्हिडिओ दाखवण्यात आले. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, भाजपाने ठाकरे गटावर निशाणा साधला.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या अपात्रतेसंदर्भातील निकालानंतर हा निकाल कसा लोकशाहीविरोधी आहे, हे पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला सभेसारखी गर्दी झाली होती. सुरुवातीला वकिलांनी कायदेशीर बाजू मांडल्या आणि नंतर त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिले.
आपल्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदारी फिरायची वेळ आली
आशिष शेलार यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागितले, जे अयोध्येत राम मंदिर उभे राहणार का? याच्याही तारखा आणि पुरावे मागत होते, देवाचे अस्तित्वच नाकारणारे ज्यांना अतिप्रिय वाटू लागलेत, राम काल्पनिक आहे, राम सेतू काल्पनिक आहे, असे म्हणणाऱ्या काँग्रेससोबत संगत करुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभू रामाच्याच अस्तित्वाचे पुरावेच जे मागू लागले होते, आज त्यांना बघा, आपल्याच अस्तित्वाचे पुरावे घेऊन दारोदारी फिरायची वेळ आली! राम नाम ही परम सत्य है। बाकी सभी यहाँ व्यर्थ है। जय श्रीराम!!, या शब्दांत आशिष शेलार यांनी पलटवार केला.
दरम्यान, लवादाने जो निकाल दिला त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. शेवटची आशा म्हणून थेट जनतेच्या न्यायालयात आलो आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाने माझ्यासोबत येऊन जनतेत उभे राहावे. तिथे त्यांनी सांगावे की शिवसेना कुणाची मग जनताच ठरवेल. राहुल नार्वेकरांना पुढे करून राजकारण करणारे लोकशाहीद्रोही आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचीही वाट पाहत नाही, विधानसभा निवडणुका घ्या, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.