Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 03:20 PM2024-10-04T15:20:55+5:302024-10-04T15:46:42+5:30
BJP Ashish Shelar And Aaditya Thackeray : आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "गेल्या दहा वर्षात मुंबई महापालिकेने एकही नवीन धरण बांधलं नाही, नवीन पाण्याची व्यवस्था केली नाही, उलट गारगाई धरण प्रकल्प रद्द केला आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारला. तोही पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे आज मुंबईची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे याला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आणि त्यांचा उबाठा सेना हा पक्ष आहे" असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबईत ठिकठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे, अनेक ठिकाणी पाणीच येत नाही, त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या अनेक तक्रारी सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांकडे केल्या जात आहेत. आज याबाबत माध्यमांशी संवाद असताना शेलार म्हणाले की, ९० च्या दशकामध्ये मुंबईच्या पाणीपुरवठ्या बाबत अभ्यास करून कृती आराखडा सादर करण्यासाठी डॉक्टर माधवराव चितळे यांची समिती मुंबई महापालिकेने गठीत केली होती. या समितीने गारगाई आणि पिंजाळ व मध्यवैतरणा या तीन धरणांचा कृती आराखडा मुंबई महापालिकेला तयार करून दिला.
आदित्य ठाकरे मंत्री असताना आणि त्यांचे सरकार महानगरपालिकेमध्ये असताना त्यांनी केलेलं पाप मुंबईकरांना भोगायला लागत आहे. मुंबईकरांच्या डोळ्यातून अश्रू निघत आहेत
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 4, 2024
📍माध्यमांशी संवाद, मुंबई #AshishShelar#BJPMaharashtrapic.twitter.com/5xb2kH1pCx
"मुंबई महापालिकेने यातील मध्य वैतरणा प्रकल्प 2014 ला पूर्ण केला. त्यानंतर एकही प्रकल्प महापालिकेने हाती घेतला नाही. गारगाई या धरणाच्या परवानग्या आणि नियोजन सुरू झाले होते. मात्र तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सरकार राज्यात आणि महापालिकेत असताना हा प्रकल्प रद्द केला. कंत्राटदारांच्या प्रेमातून अत्यंत महागडा असलेला समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ४४०० कोटी रुपये होती आता हा प्रकल्प ८००० करोड वर गेला तरी सुद्धा अद्याप त्याची निविदा निघालेली नाही. त्याला प्रतिसाद मिळत नाही. या सगळ्याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे."
"आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हा केलेला खेळखंडोबा याचे दुष्परिणाम आज मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. पिण्याच्या पाण्यावरून मुंबईकरांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आज हे जे मुंबईत दुर्दैवी चित्र उभे राहिले आहे त्याला संपूर्ण जबाबदार आदित्य ठाकरे आहेत. मुंबई ३४% पाणी गळती आहे असे महापालिका सांगते आहे. त्यासाठी कोट्यावधीची कंत्राटे दिली, पण त्याचे पुढे झाले काय? हे कळायला मार्ग नाही" असे गंभीर आरोप आमदार शेलार यांनी केला.
"समुद्राचे पाणी गोडे करणे याबाबत जागतिक पातळीवर अभ्यासांती सिद्ध झाले आहे की ते पर्यावरण घातक आहे, शिवाय खर्चिक आहे ही बाब आम्ही त्याही वेळा लक्षात आणून दिली होती. मात्र थातूरमातूर कारण देऊन हा प्रकल्प पुढे रेटला व गारगाई प्रकल्प रद्द केला. गारगाई प्रकल्पामध्ये बाधित होणारी झाडांचे पुनर्वसन व नवी वनराई निर्माण करण्यासाठी जागाही निश्चित झाली होती. पण आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द केला व आपल्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला त्याचे परिणाम आज मुंबईकर भोगत आहेत" असेही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.